पुणे : घोरपडीतील आर्मी पब्लिक स्कूलमधील भरती प्रक्रियेत तोतया उमेदवाराला पकडण्यात आले. या प्रकरणी तोतया उमेदवारासह दोघांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी अर्जुन जादूसिंग उर्फ कचरु भवरे (वय २६, रा. सागरवाडी, बदनापूर, जि. जालना) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार मूळ उमेदवार अमोल कैलास जाेनवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिता शर्मा (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मी पब्लिक स्कुलच्या नवोदय विद्यालय समितीकडून रविवारी भरती प्रक्रियेअंतर्गत (नाॅन टिचिंग स्टाफ) परीक्षा घेण्यात आली. त्या वेळी मूळ उमेदवार जोनवाल याच्याऐवजी अर्जुन हा उमेदवार म्हणून परीक्षेसाठी उपस्थित राहिला.
पर्यवेक्षकांनी कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा अर्जुन भवरे याच्याकडे असलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले, तसेच तो तोतया उमेदवार म्हणून उपस्थित राहिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी दिली.