पुणे : गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील एका डॉक्टर महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल संच हॅक करुन बँक खात्यातून परस्पर रोकड लांबविल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत एका डॉक्टर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय डॉक्टर महिला कर्वेनगर भागातील सहवास सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गॅस कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. गॅस बिल थकीत असून, गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एमएनजीएल एपीके फाईल पाठविली. ही फाईल त्यांना उघडण्यास सांगितले.
चोरट्यांनी महिलेचा मोबाइल संच हॅक केला. मोबाइलमधील बँक खात्याची गोपनीय घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून चार लाख ९५ हजार रुपये लांबविले. खात्यातून रकम दुसऱ्याच खात्यात वळविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.
पोलिसांचे आवाहन
वीज, तसेच गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. चोरटे नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवितात. अशा प्रकारचे संदेश, तसेच बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.