पुणे : ‘मालिकांच्या भाऊगर्दीत रंगभूमीचे निशाण टिकविणारा सेनापती म्हणजे प्रशांत दामले’, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी प्रशांत दामले यांचा मंगळवारी गौरव केला. ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रत्येक प्रयोग रंगतो ही या वास्तूचीच किमया आहे‘, असेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचा वर्धापन दिन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रभावळकर यांच्या हस्ते प्रशांत दामले आणि गौरी दामले यांना यशवंत-वेणू पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी प्रभावळकर बोलत होते. माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, दीपक गुप्ते या वेळी उपस्थित होते.
‘प्रशांतचा रंगभूमीवरील वावर चैतन्यमय असतो. त्याची रंगभूमीवरील निष्ठा आणि स्वत:च्या कामात आनंद घेणे हे इतरांसाठी मार्गदर्शक आहे. उत्तम अभिनयाबरोबरच गायन कलेची देणगी प्रशांत दामले यांना लाभलेली आहे. त्यामुळे स्वत:तील गायकाला न्याय देत त्यांनी आपली नाट्यक्षेत्रातील वाटचाल सुरू ठेवावी,’ अशी अपेक्षा प्रभावळकर यांनी व्यक्त केली.
दामले म्हणाले, ‘दिलीप प्रभावळकर यांचे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी आदर्श आणि दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्यातील कलाकाराला सतत प्रश्न पडतात हे कला सादरीकरणासाठी आवश्यक आहे. नाट्य क्षेत्रात वावरताना वातावरण हसते खेळते ठेवणे हे मी दिलीप भैय्यांकडूनच शिकलो आहे.
‘कुटुंब किर्रतन (सर्वोत्कृष्ट नाटक), ठकीशी संवाद (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक), दोन वाजून बावीस मिनिटांनी (विशेष लक्षवेधी नाटक) तसेच संदेश कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट लेखक), विजय केंकरे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), संकर्षण कऱ्हाडे (सर्वोत्कृष्ट अभिनेता), शुभांगी गोखले (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), दत्ता शिंदे (पडद्यामागील कलाकार) यांचा या वेळी यशवंत सन्मानाने गौरव करण्यात आला. नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेला नाट्य संमेलन घेण्याची संधी मिळावी, अशी विनंती सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात केली.
नाट्य क्षेत्राला वाहून घेण्यासाठी मला पत्नी गौरीची खंबीर साथ लाभली. ‘प्रशांत, प्रयोग करू नकोस’ असे तिने मला आजपर्यंत कधीही म्हटले नाही. मला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. परंतु पती-पत्नीच्या नावाने मला व गौरीला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. नाटक, तालमी, प्रयोग, दौरे याविषयी माहिती असणारी पत्नी लाभली हे माझे सुदैव आहे.- प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेते
