महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिका सेवेमुळे अनंत चतुर्दशी निमित्त निघालेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान १०८ रुग्णांना उपचार मिळाले. हे रुग्ण पुणे जिल्ह्यातील असून यापैकी २४ रुग्णांना तातडीचे उपचार देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात १४ ठिकाणी महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाच्या १०८ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौक, बेलबाग चौक, बिबवेवाडी, महात्मा फुले मंडई, नगरकर तालीम, ओंकारेश्वर मंदिर, शनिवार वाडा, शिवाजीनगर पोलीस परेड मैदान, स. प. महाविद्यालय आणि तुळशीबाग येथे या रुग्णवाहिका उभ्या करण्यात आल्या होत्या. दिवसभरात १०८ रुग्णवाहिकेला १०८ ‘कॉल’ आले. यामध्ये पाच अपघात, एक हृदयविकार, तीन उंचावरून पडण्याच्या घटना, ६७ वैद्यकीय कारणांची नोंद करण्यात आली आहे. १४ पॉलि ट्रॉमा रुग्ण आणि १६ इतर रुग्णांनाही १०८ रुग्णवाहिकेने उपचार दिले तसेच रुग्णालयांपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा : Video : गोष्ट पुण्याची : शाहिस्तेखानामुळे पुण्याला मिळाले ‘स्वारगेट’! नेमका काय आहे इतिहास?

१०८ रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे म्हणाले, अशक्तपणा, गुदमरल्यासारखे वाटणे यामुळे काही मुली आणि महिलांना १०८ रुग्णवाहिकेत उपचार देण्यात आले. छातीत दुखण्याची तक्रार घेऊन आलेल्या एका रुग्णाला हृदयविकार असण्याची शंका आल्याने प्रथमोपचार करून त्या रुग्णाला पुढील उपचारांसाठी कमला नेहरू रुग्णालयात पोहोचवण्यात आले. विसर्जन रथावर नाचताना रस्त्यावर पडून हाड मोडलेल्या काही रुग्णांनाही पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा वापर झाल्याचे डॉ. जावळे यांनी स्पष्ट केले.