पुणे : चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा लावून त्या गहाण ठेवणाऱ्या चौघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी वडगाव शेरी भागातील एका सराफ व्यावसायिकाची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून सोन्याच्या मुलामा दिलेल्या चार अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ओमप्रकाश शामसुंदर परदेशी (वय ५८, रा. वडगावशेरी), फय्याज चांद सय्यद (वय ३५, रा. वडगाव शेरी), आरिफ खलील शेख (४१, रा. येरवडा), शरण माणिकराव शिलवंत (४६, रा. धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार सराफ व्यावसायिकाचे वडगाव शेरी भागात सराफी पेढी आहे. काही दिवसांपुर्वी रिक्षांमधून दोघे जण त्यांच्याकडे आले. त्यांनी सोन्याच्या अंगठ्या असल्याचे भासवून चार अंगठ्या गहाण ठेवून त्याबदल्यात एक लाख रुपये घेतले. या अंगठ्या बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली तांत्रिक तपास करुनआरोपी परदेशीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत परदेशीच्या साथीदारांची नावे निष्पन्न झाले. आरोपी शेख हा शिलवंत याच्याकडून या बनावट अंगठ्या घेत होता. परदेशी आणि सय्यद या अंगठ्या सराफ व्यावसायिकांकडे गहाण ठेवून फसवणूक करत होते. आरोपी्ंनी अशा पद्धतीने शहरातील आणखी काही सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, दत्तप्रसाद शेडगे आणि तपास पथकाने ही कामगिरी केली.
© The Indian Express (P) Ltd