पुणे : लष्कर भागात टोळक्याकडून पिता-पुत्राला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अल्हान साजीद खान याला अटक करण्यात आली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत अथर्व अमोल बिल्लमपल्ली (वय २४, रा. कामाठीपुरा, लष्कर), त्याचे वडील अमोल हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अथर्व याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी (१५ फेब्रुवारी) लष्कर भागात फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फराळ वाटपानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अमोल आणि त्याचे वडील रिक्षातून केटरिंग व्यावसायिकाकडून घेतलेले टेबल परत देण्यासाठी निघाले होते. आोपी खान आणि साथीदार हे दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन त्यांच्यात किरकोळ वाद झाला.
त्यानंतर खान आणि साथीदारांनी रिक्षा अडवून बिल्लमपल्ली पिता-पुत्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. टोळक्याने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले. त्यानंतर आरोपी पसार झाले. पसार झालेल्या खान याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक दांडगे तपास करत आहेत.
शाळेतील वादातून अल्पवयीनाला मारहाण
शाळेतील वादातून अल्पवयीनाला पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. या प्रकरणी अल्पवयीनासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका अल्पवयीनाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीनाचा शाळेत एकाशी वाद झाला होता. १२ फेब्रुवारी रोजी आदर्शनगर परिसरातून अल्पवयीन निघाला होता. त्या वेळी तीन अल्पवयीनांनी त्याला अडवून चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस हवालदार करपे तपास करत आहेत. किरकोळ वादातून शाळकरी मुलांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी कोथरूड, भवानी पेठ भागात शाळकरी मुलांना वादातून मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या.
रखवालदाराला मारहाण
दारू पिणाऱ्या टोळक्याला हटकल्याने रखवालदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना वाघाोली परिसरात घडली. याबाबत धमेंद्रकुमार सिंह (वय ४१, सध्या रा. गुलमोहोर पार्क, वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. समस्तीपूर, बिहार ) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील भावडी रस्ता परिसरातील एका खासगी जागेत आरोपी आणिि साथीदार दारू पित होते. त्या वेळी रखवालदार सिंह याने आरोपींना हटकले. आरोपींनी सिंह याला शिवीगाळ करुन बांबूने मारहाण केली. मोकळ्या जागेतील केबीन, तसेच दुचाकीची तोडफोड केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.

