पुणे : पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत मद्यपी मोटारचालकाने तपासणी करण्यास नकार देऊन पोलिसांशी अरेरावी केली. कारवाईस विरोध करुन तपासणी करणाऱ्या पोलिसांसमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे रिव्हाॅल्वर सापडले. लष्कर भागात ही घटना घडली. याप्रकरणी मोटारचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अरुण निवृत्ती सूर्यवंशी (वय ५०, रा. सेक्टर नं. ८, एरोली, नवी मुंबई), बाबुराव धर्माजी आंबेगावे (वय ५५, रा. सोमराणा ता. उदगीर, जि. लातूर), लक्ष्मण प्रल्हाद पाटील (वय ३९, रा. रिव्हर व्ह्यू सोसायटी, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यंची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी विजय राम सुतार यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीसमोर रविवारी मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहन तपासणी सुरु केली होती. त्यावेळी सूर्यवंशी आणि त्याचे मित्र आंबेगावे, पाटील हे पूलगेट परिसरातून निघाले होते. पोलिसांनी मोटार थांबविली. मोटारचालक सूर्यवंशी आणि मित्रांनी मद्यप्राशन केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची तपासणी सुरु केली. तेव्हा सूर्यवंशी आणि मित्रांनी कारवाईस विरोध करुन पोलिसांशी अरेरावी केली. भर रस्त्यात त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मध्यरात्री सार्वजनिक शांततेचा भंग केला.
पोलिसांना शिवीगाळ करुन मी रस्त्यात गळफास घेऊन आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली. तेव्हा त्याने कंबरेत रिव्हाॅल्वर खोचल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सूर्यवंशी हा ठेकेदार आहे. त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले.