पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात अधिष्ठातापदाची संगीत खुर्ची सुरू आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना मे महिन्यात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतर डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. आता तीनच आठवड्यांत डॉ. म्हस्के यांच्याकडील कार्यभार काढून डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील सावळागोंधळ समोर आला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यात अदलाबदल केल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना गेल्या महिन्यात अटक झाली. हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही, असा ठपका ठेवून तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला. डॉ. म्हस्के यांनी ३० मे रोजी ससूनच्या अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर तीनच आठवड्यांत डॉ. म्हस्के यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

हेही वाचा…पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रीपेड रिक्षा! प्रवाशांची लूट थांबणार; मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार सेवा

मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागातील प्राध्यापक डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव हा बदल करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. मात्र, वारंवार अधिष्ठाता बदलण्यात आल्याने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह ससूनच्या व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. अधिष्ठात्यांची खुर्चीच अधांतरी असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नसल्याची स्थिती आहे. त्यातून रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…आमच्या समस्या सोडवा! पिंपरी-चिंचवडमधील उद्योग संघटनांचे थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे

ससूनमध्ये वर्षभरात चार अधिष्ठाता

ससूनमध्ये गेल्या वर्षभरात चार अधिष्ठाता नेमण्यात आले. डॉ. संजीव ठाकूर यांना ललित पाटील पलायन प्रकरणात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर डॉ. विनायक काळे यांच्याकडे हे पद देण्यात आले. डॉ. काळे यांना या वर्षी मे महिन्यात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यानंतर डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. आता त्यांच्याकडील हा कार्यभार काढून डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.