Pune Municipal Corporation Election Result Update 2026: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेले मतदान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होते. दुपारनंतर अचानक शहरातील अनेक प्रभागातील मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. मतदारांच्या रांगा लागल्याने काही ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

महापालिकेच्या ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रकिया राबविली. यासाठी ५२.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. यंदाची महापालिकेची निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली. मतदारांचे बदललेले प्रभाग आणि मतदान केंद्रे, त्यातून निर्माण झालेला गोंधळ, मतदारयाद्यांत नाव शोधण्यासाठीची गडबड, मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्याबाबत संभ्रम, मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी नसलेली पुरेशी सोय अशा कारणांमुळे मतदानाच्या दिवशीही गोंधळ उडाला होता. नऊ वर्षापूर्वी झालेल्या महापालिका २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मतदानामध्ये घट झाल्याचे पहायला मिळाले. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीमध्ये ५५.५६ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या वर्षी यामध्ये घट झाली.

सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यासाठी प्रशासनाला मध्यरात्री दोन वाजले. निवडणुकीची मतमोजणी आज (शुक्रवारी) १६ जानेवारी रोजी होणार आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे. मात्र यापूर्वीच शहरातील काही भागामध्ये उमेदवारांच्या अभिनंदनाचे जाहिरात फलक, बॅनर लागण्यास सुरुवात झाली आहे. उत्साही करकर्त्यांकडून हे फलक लावण्यात येत आहेत.

पुण्यातील गणेश पेठ परिसरात लावण्यात आलेले जाहिरात फलक चर्चेत आले असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी असणारे गणेश बीडकर यांच्या विजयाचे हे फ्लेक्स आहेत. त्यावर लिहिलेला मजकूर चर्चेचा विषय ठरत आहे. बिडकर यांना नगरसेवक पदी विजयी झाल्याच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले जाहिरात फलकांवर ‘महापौर साहेब’ असा उल्लेख करत हे फलक लावण्यात आले आहेत. गणेश पेठ रास्ता पेठ या भागात हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केइएम हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक २४ मधून गणेश बिडकर यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र प्रणव रिंगणात उतरले आहेत. ही लढत अटीतटीची मानली जात आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये गणेश बिडकर विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत झाली होती. त्यावेळी धंगेकर हे काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत बिडकर यांना पराभव सहन करावा लागला होता.

त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे आमदार म्हणून देखील विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून खासदारकीची निवडणूक देखील लढविली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील धंगेकर यांचा पराभव झाला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक २४ मधून चिरंजीव प्रणव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाकडून ते निवडणूक लढवित आहेत. बिडकर विरुद्ध धंगेकर या लढतीमध्ये कोणाचा विजय होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.

वारजे परिसरात दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या विरोधात निवडणूक लढवलेले आणि आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवणारे सचिन दोडके यांच्या विजयाचे फलक वारजे भागात लावण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ३२, वारजे पॉप्युलर नगर येथून दोडके निवडणूक लढवित आहेत.