पुणे : श्री साईबाबा पालखी सोहळ्यात ज्येष्ठ महिलेची ९१ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना फडके हौद परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. रविवारी (२९ जून) सकाळी साडेअकराच्या पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९१ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. सोनसाखळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून दोन लाख १२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने विमनातळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोहगाव भागात राहायला आहेत. त्या कात्रज ते लोहगाव या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दोन लाख १२ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक घागरे तपास करत आहेत.
सोन्याचे कडे चोरी
सिंहगड रस्ता परिसरात भाजी खरेदीसाठी गेलेल्या एकाच्या हातातील ८० हजारांचे सोन्याचे कडे (ब्रेसलेट) चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे रविवारी सायंकाळी सिंहगड रस्त्यावरील फनटाईम चित्रपटगृहाजवळ भाजी खरेदीसाठी गेले होते. त्या वेळी गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याचे कडे चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.