पुणे : जिल्हा नियोजन समितीची नव्या वर्षातील पहिली बैठक येत्या गुरुवारी (१२ फेब्रुवारी) होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या १ हजार ३७ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याचे सादरीकरण बैठकीत केले जाणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० कोटी रुपये कमी असलेला आराखडा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाकडून सदस्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. विधानभवनात गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही बैठक होईल.
जिल्हा प्रशासनाने २०२६-२७ या वर्षाचा १ हजार ३२ कोटींचा वार्षिक आराखडा तयार केला आहे. गेल्या वर्षी (२०२५-२६) जिल्हा प्रशासनाने १ हजार ९२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. राज्य सरकारने २८७ कोटींचा अतिरिक्त निधी देऊन तो १ हजार ३७९ कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली होती.
यंदा जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्याचे उद्दिष्ट कमी रकमेचे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० कोटी रुपयांनी कमी हा आराखडा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
गेल्या वर्षीच्या आराखड्यात प्रथमच अजित पवार यांनी रस्ते, वीज, स्मशानभूमी, समाजमंदिरे यासारख्या पायाभूत सुविधांचा समावेश केला होता. पण त्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जिल्ह्यातील आरोग्य केंद्राच्या सुधारणेवर भर दिला होता. जिल्ह्यात मॉडेल स्कूल, आणि मॉडेल पीएचसी हे दोन नवे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. जिल्ह्यातील ३०३ शाळांचे मॉडेल स्कूल तर १०८ पैकी २४ आरोग्य केंद्राची सुधारणांचा समावेश होता. त्यासाठी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.
