पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्याने रविवारी रात्री दहा वाजता ११ हजार क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधनता बाळगावी, असे आवाहन महापालिका आणि जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यताही जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या गुरुवारी (२५ जुलै) खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतर विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात आल्याने नदीला पूर येऊन नदीपात्रालगतच्या अनेक सोसायट्यांना त्याचा फटका बसला होता. पूर्वकल्पना न देता पाणीसोडण्यात आल्यामुळे आणि महापालिका तसेच जलसपंदा विभागात समन्वय नसल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या रोषाला जलसंपदा विभागाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे जलसंपदा विभागानेही आता सावध भूमिका घेतली आहे. हेही वाचा : “शरद पवारांवर बोललेलं लोकांना पटत नाही, म्हणूनच अजित पवारांनी…”, रोहित पवार म्हणाले… खडकवासला धरणाच्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने रविवारी रात्री ११ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून जाहीर करण्यात आले. पावसाचा प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात साहित्य किंवा जनवारे असल्याच ती तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.