पुणे : कल्याणीनगर भागात ज्येष्ट महिलेच्या गळ्यातील चार लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यानी हिसकावून नेल्याची घटना घडली. आठवडाभरात कल्याणीनगर भागात महिलेचे दागिने हिसकाविण्याची ही दुसरी घटना आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६७ वर्षीय ज्येष्ठ महिला कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी (३०) सायंकाळी बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास त्या रिक्षाने कल्याणीनगर परिसरात उतरल्या. रिक्षाचालकाला त्या भाडे देत होत्या. तेवढ्यात पाटीमागून आलेल्या चोरट्याने त्यांना धक्का दिला. ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चार लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चाेरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
आठवड्यापूर्वी कल्याणीनगर भागात पादचारी महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावण्याची घटना घडली. वर्षभरापासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले होते.
हडपसर भागात वस्त्रदालनातून रोकड चोरी
शहरात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर- सासवड रस्त्यावरील भेकराईनगर भागात वस्त्रदालनाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर तक्रारदार तरुणाचे वस्त्रदालन आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातून १७ हजार ६०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. दुकानाचा दरवाजा उचकटून रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत. शहरात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.चंदननगर, हडपसर, मुंढवा, बाणेर भागात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

