पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांना रविवारी विशेष न्यायालयाने पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल सुरेंद्र अगरवाल आणि आई शिवानी (दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर अगरवाल दाम्पत्याला रविवारी दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हेही वाचा…कोथिंबीर जुडी पन्नाशीपार; पालेभाज्यांचे दर महिनाभर तेजीत…

शिवानी यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. विशाल याने मदत तपसात उघडकीस आले. याप्रकरणी ससूनमधील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अज. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, तसेच शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने अगरवाल दाम्पत्याला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने दिले आहेत. या गुन्ह्यात मुलाचे वडील विशाल, आई शिवानी आणि आजोबा सुरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर अगरवाल यांनी त्यांचा मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात विशाल आणि वडील सुरेंद्र यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा…पुणे : बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक

विशाल अगरवालसह पब मालकाच्या जामीन अर्जावर सुनावणी

विशाल अगरवाल आणि पब मालकांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. याबाबत पोलिसांनी त्यांचे म्हणणे शनिवारी (१ जून) सादर केले आहे. आरोपींच्या अर्जावर ५ जून रोजी सुनावणी होणार आहे.