पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या तीनपैकी दोन, तर पंचायत समितीच्या सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत. तालुक्यात प्रथमच भाजपला एक जागा मिळाली आहे.
जिल्हा परिषदेच्या भूगाव-पिरंगुट गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम इंगवले विजयी झाले आहेत. पौड-अंबडवेट गटातून मिलिंद वाळंज विजयी झाले असून, माण-हिंजवडी गटातून भाजपचे शिवाजीराव बुचडे यांनी मारली आहे. बुचडे यांच्या विजयामुळे तालुक्यात भाजपने प्रथमच विजयाचे खाते उघडले आहे.
मुळशी पंचायत समितीच्या सर्वच गणांमध्ये चुरस पहायला मिळाली. भूगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) दगडूकाका कंरजावणे विजय झाली असून, पिरंगुट गणातून राहुल पवळे, पौड गणातून काजल मोरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभूत केले. अंबडवेट गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण धनवे विजयी झाले असून, माण गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मंदा शेळके यांनी बाजी मारली आहे. हिंजवडी गणामध्ये भाजपच्या ऐश्वर्या वाघमारे विजयी झाल्या आहेत.
