पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वेळोवेळी तपासणी आणि जनजागृती केली जात असतानाही फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत असून, एक एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत अशा प्रवाशांकडून एक कोटी २ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ‘पीएमपी’ने दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
‘पीएमपी’कडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांपर्य़ंत दररोज १८०० ते दोन हजार बस सुमारे ७५० मार्गिकांवर धावतात. दररोज एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, यामध्ये विनातिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. गर्दीचा फायदा घेऊन पास अथवा ऑनलाइन तिकीट काढल्याचे सांगून अनेक जण विनातिकीट प्रवास करतात. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या वाढली असल्याचे तपासणी पथकाने केलेल्या दंडात्मक कारवाईतून स्पष्ट होत आहे. या फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना, तपासणी मोहीम, जनजागृती, दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, तरीही त्याला दाद दिली जात नसल्याचे चित्र आहे.
दोन वर्षांचा आढावा
आर्थिक वर्ष – दंडात्मक कारवाई (रुपयांमध्ये)
- २०२४-२५ – एक कोटी २५ लाख
- २०२५-२६ (डिसेंबरपर्यंत) – एक कोटी १ लाख ५००
पीएमपीकडून सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल असेच प्रवास दर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाने विनातिकीट प्रवास करू नये. पीएमपीकडून शहरातील महत्त्वाच्या बस थांब्यांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी तपासणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी भविष्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. – किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांचा आढावा
- एप्रिल – ७,८२,०००
- मे – ७,८३,०००
- जून – ७,८०,०००
- जुलै – ११,२२,०००
- ऑगस्ट – १३,४९,५००
- सप्टेंबर – १२,४९,५००
- ऑक्टोबर – १२,६३,०००
- नोव्हेंबर – १५,९०,०००
- डिसेंबर – ११,९९,५००
- एकूण – १,०१,१८,५००
