पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १३ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचे घटना सदाशिव पेठेतील नागनाथ पार परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सदाशिव पेठेतील बॅरिस्टर गाडगीळ रस्त्यावर असलेल्या लोकहितवादी अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत.
सदनिका बंद करुन त्या बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, हिरेजडीत दागिने असा १३ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. नागनाथ पार परिसरातील बॅरिस्टर गाडगीळ स्ट्रीट गजबजलेला आहे. या भागात घरफोडीचा प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट उडाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन चोरटे ऐवज लांबवितात. उन्हाळी सुटीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.