पुणे : ‘मोफत साडी, धान्य वाटप, शेठला मुलगा झाला आहे’, अशी बतावणी करुन शहरात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्यचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांकडील बतावणी करुन त्यांच्याकडील पाच लाखांचा ऐवज चोरुन नेला. पर्वती, भारती विद्यापीठ आणि हडपसर भागात फसवणुकीच्या घटना घडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा सोसायटी रस्त्यावर ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन त्यांच्याकडील ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ६२ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास भारती विद्यापीठ परिसरातून निघाल्या होत्या. आमच्य भागातील नगरसेवकाला मुलगा झाला आहे. ते ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करत आहेत, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. तुमच्याकडील दागिने काढून पिशवी ठेवा, असे सांगून चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. पिशवीतून ५५ हजारांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

पर्वतीतील शाहू वसाहत परिसरात अशाच प्रकारची घटना घडली. याबाबत एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शाहू वसाहतीत राहायला आहेत. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्या शाहू वसाहत परिसरातून निघाल्या होत्या. चोरट्यांनी त्यांना अडवले. आमच्य शेठला मुलगा झाला आहे. ज्येष्ठ महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी त्यांना दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यांना बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी पिशवीतील एक लाख २६ हजारांचे दागिने चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.

पोलीस असल्याच्या बतावणीने साडेतीन लाखांचे दागिने चोरी

पोलीस असल्याची बतावणी करुन हडपसरमधील मांजरी भागात एका ज्येष्ठ नागरिकाकडील साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मांजरीतील बेल्हेकर वस्ती परिसरातून निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. या भागात चाेऱ्या होतात. दागिने काढून ठेवा, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्याकडे पाेलीस असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडील सोनसाखळी, अंगठी काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात चला, असे सांगून चोरट्यांनी त्यांन बोलण्यात गुंतविले. त्यांच्याकडील साडेतीन लाखांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune senior citizens looted with lure of free saree and food grains pune print news rbk 25 css