पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला असताना आता रंगाच्या माध्यमातून ध्वजाचा रंग भगवा, हिरवा करण्याची भाषा बोलली जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी हे संविधानाला अभिप्रेत नसल्याचे स्पष्ट करत असे स्वप्न पाहणाऱ्यांना परखड शब्दात सुनावले.
‘भारतीय संविधानात सगळे धर्म, भाषा, रंगाच्या रक्षणाची हमी दिली असून संविधान टिकविण्यासाठी विपरीत स्वप्न पाहणाऱ्याविरोधात एकत्रित लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
लोकशाही उत्सव समिती आणि मिळून साऱ्याजणी मासिक यांच्यावतीने विद्या बाळ स्मृती जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम एस.एम.जोशी फाऊंडेशन येथील मोंडकर सभागृहात सायंकाळी पार पडला. डाॅ. गिताली वि. म. यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार यांना प्रदान करण्यात आला. तसेच ॲड. निशा शिवूरकर लिखित ‘गोष्ट तिरंगा ध्वजाची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राजन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
राजन म्हणाले, ‘आपल्याकडे इतिहासितील सर्व गोष्टी, पुरावे उपलब्ध असताना गोष्ट खोटी करून सांगण्याचे कौशल्य प्राप्त झालेला फार मोठा वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे बालकांपासून तरुण वर्गापर्यंत चुकीचा इतिहास पोहचवला जात आहे. राष्ट्रध्वजातील तीन रंग संविधानाने भाषा, धर्म, पंथ, रंग, वर्ण यांचा आधार घेऊन निश्चित केले आहेत. त्यातूनच संस्कृतीच्या रक्षणाची हमी, देश कसा टिकला पाहिजे याची हमी स्पष्ट होते, तरी काही लोक या विपरीत प्रयत्न करत असून त्यासाठी दीर्घकालीन लढा आहे.’
प्रत्येकाला मातृभाषा, रंग जपण्याचे अधिकार सविधानाच्या प्रतिकातून आश्वस्त करतात. प्रत्येकाच्या भाषेचा, रंगाचा आदर सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. हा आपला अभिमान आहे. कोणत्याही देशाची प्रतिके हे मानसे जोडण्यासाठी असतात, नाकारण्यासाठी नाही. त्यामुळे जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या इतिहासातील गोष्टींच्या रुपाने, अभ्यासातून प्रभाविपणे पुढे आणण्याची गरज असल्याचेही राजन यांनी स्पष्ट केले.
‘देशात सर्वधर्म समभाव, स्त्री पुरूष समानता असे गौरवाने सांगितले जात असले, तरी वर्ण आणि जातीचे कप्पे तळागाळात रुजले आहेत. जात वर्ग लिंग भाव समूळ नष्ट करून लोकशाही सक्षम रहावी म्हणून समूळ जातीअंत करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे झाल्यास देश सार्वभौम असल्याचे म्हणता येईल. – उर्मिला पवार, ज्येष्ठ लेखिका

