सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने चोरट्यांनी कात्रज पीएमपी स्थानक परिसरात दोन ज्येष्ठ महिलांकडील एक लाख २८ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला दुपारी तीनच्या सुमारास कात्रज पीएमपी स्थानक परिसरात थांबल्या होत्या. त्या वेळी दोन चोरटे तेथे आले. स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला दाखविले आणि पितळ धातूचे सोन्यासारखे दिसणारे बिस्कीट पाहण्यास दिले. चोरट्यांच्या आमिषाला महिला बळी पडली. महिलेने चोरट्यांना ५० हजारांचे मंगळसूत्र दिले. चोरट्यांनी त्यांना सोन्याप्रमाणे दिसणारे बनावट बिस्कीट दिले. महिलेचे मंगळसूत्र लांबवून चोरटे पसार झाले.

दरम्यान, कात्रज पीएमपी स्थानक परिसरात स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून आणखी एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी महिलेला सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून महिलेकडील ७८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. डी. धावटे तपास करत आहेत.