पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला हटविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी लावण्या मुकुंद शिंदे (वय ३२, रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुषमा सातपुते, प्रियंका खरात, प्रियंका सोनवणे, अरबाज जमादार, लखन वाघमारे, वंदना मोडक, दिपाली कवडे, अक्षता भिमाले यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…“बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार?” संजय काकडेंचं वक्तव्य; मतांचं गणित मांडत सांगितलं कोण जिंकणार?

शिवाजीनगर परिसरातील डेंगळे पूल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय आहे. पक्ष कार्यालयात अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आाणि कार्यकर्त्यांनी कार्यालयातील कोनशिला नुकतीच हटवली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून द्वेष निर्माण केला, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करत आहेत.