पुणे: माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो. मात्र, सर्वधर्म समभावाचा विचार देणारा वारकरी संप्रदाय मी मानतो. पंढरीच्या पांडुरंगाचे मीही दर्शन घेतो, फक्त दर्शन घेताना मी त्याचा गाजावाजा करत नाही. माझ्या अंतःकरणात पांडुरंगाचा, ज्ञानोबा-तुकोबाचा विचार असतो. त्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वतीने आयोजित पहिल्या वारकरी संमेलनाचा समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. तसेच वारकऱ्यांच्या व्यासपीठावर येणार म्हटल्यावर काही लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. मला पोलिसांचा फोन आला. परंतु वारकरी संप्रदायाचा विधायक विचार जतन करावा आणि नवीन पिढीत तो रुजावा, यासाठी वारकऱ्यांसोबत ताकदीने उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वतीने शुभारंभ लॉन्स येथे आयोजित पहिल्या वारकरी संमेलनाच्या समारोपावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, हभप भारत महाराज जाधव, हभप राजेंद्र येप्रे महाराज, राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल महाराज मोरे उपस्थित होते.

हेही वाचा : पुणे: डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर दहीहंडीत बंदी ? सहपोलीस आयुक्तांकडून पुढील साठ दिवस ‘लेझर बीम’वर बंदीचे आदेश

यावेळी शरद पवार म्हणाले की, समाजमन पुरोगामी विचारांवर आधारित असावे. कर्मकांड, रूढी परंपरा याविरोधात भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र वारकरी संप्रदाय आध्यात्मिक आघाडीच्या नावाने काम करणारे अनेक लोक ठराविक भूमिकेतून विचार मांडण्यावर भर देत आहेत. त्यातून जाती धर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे सुसंवाद करण्याची गरज मला नेहमी वाटते. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांना संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे. आपल्या विचारांची व्यापकता वाढवून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचे काम केले पाहिजे. ढोंगी राजकारण, समाजकारण करणाऱ्यांना योग्यवेळी चोप देण्याचे काम संताच्या विचारांनी केले आहे. त्याच विचारावर आधारित सामंजस, मैत्रीपूर्ण समाज घडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर सराइतांकडून कोयत्याने वार, हडपसर भागातील घटना

तसेच ते पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंध समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांनी सक्रिय व्हावे लागेल. तरुण पिढीला विधायक विचार देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यात संत विचारांच्या मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.