पुणे: गेल्या काही वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याने हैदोस घातला आहे. महिनाभरात तिघांचा बळी बिबट्याने घेतला आहे. बिबट्यापासून संरक्षण मिळावं म्हणून स्थानिक महिलांनी अनोखी शक्कल लढवत देशी जुगाड केला आहे.

बिबट्या आपल्या भक्षावर नजर ठेवून थेट हल्ला करतो. सर्वात आधी भक्ष्याच्या मानेला पकडतो, हेच हेरून शिरूरमधील पिंपरखेड येथील महिलांनी पट्टा आणि त्याला टोकदार लोखंडी खिळे असा जुगाड करत स्वतःचे बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी शक्कल लढवली आहे. “बिबट्या आणि कुत्र्याचा संघर्ष बघितला, कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता, त्यामुळे बिबट्याला कुत्र्याला घेऊन ओढता येत नव्हतं. मानेवर हल्ला करता येत नव्हता; त्यामुळे कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला,” असं स्थानिक शेतकरी महिलांनी सांगितलं. हीच शक्कल माणसांसाठी उपयुक्त ठरू शकते असं त्यांना वाटलं आणि गळ्यातील पट्टा तयार करून त्याला टोकदार खिळे लावण्यात आले आहेत.

बिबट्याने हल्ला केल्यास आपण सुखरूप वाचू शकतो असं महिलांचं म्हणणं आहे. शिरूर पिंपरखेड येथे बिबट्याची दहशत आहे. अजूनही महिला, पुरुष हे बिबट्याच्या दहशतीत शेतातील कामं करत आहेत. पट्ट्यामुळे महिलांना संरक्षण मिळेल अशी आशा आहे.