आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होते आहे. वर्ल्ड कप कोण जिंकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी विश्वचषकाचे पुण्यात अनावरण केले. त्यानंतर सेनापती बापट रोड येथून विश्वचषकासोबत भव्य अशी रॅली काढण्यात आली.
या रॅलीत ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सेनापती बापट रोड ते शेतकी महाविद्यालयादरम्यान रॅली काढण्यात आली. या रॅलीचे हजारो पुणेकर नागरिकांनी ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. ‘तर जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा’ आणि ‘भारत माता की जय’ हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.
हेही वाचा – नागपूर : दोनशे ‘लॅपटॉप’ निकामी, नेमके घडले काय ?
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार म्हणाले की, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तसेच आपल्या देशात वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्याबद्दल विशेष आनंद होत आहे. गहुंजे येथील स्टेडियम येथे पाच सामने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे. पुण्यासह जगभरातील क्रिडा प्रेमी गहुंजे स्टेडियम येथे होणार्या सामन्यांना मोठ्या संख्येने हजेरी लावतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – नागपूर: नाल्यांमधील अडथळ्यांकडे वेळीच लक्ष दिले असते तर…
आज पुण्यातील सेनापती बापट रोड तेथून फर्ग्युसन महाविद्यालय मार्गे शेतकी महाविद्यालय दरम्यान वर्ल्डकप रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शेतकी महाविद्यालय येथे समाप्त होणार असून त्या ठिकाणी पुणेकर नागरिकांसाठी वर्ल्डकप पाहण्यासाठी ठेवला जाणार आहे. तसेच त्यावेळी नागरिकांना वर्ल्ड कप सेल्फी काढण्याची संधीदेखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.