पुणे : सायबर चोरट्यांकडून तिघांची तब्बल ६८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण धानाेरी भागात राहायला असून, तो खासगी कंपनीत नोकरी करतो. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. चोरट्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी २६ लाख रुपये घेतले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला नफा झाल्याचे भासविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.
दुसऱ्या एका घटनेत सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.
हे ही वाचा…अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून एकाची ११ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाला सायबर चोरट्यांनी घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखविले होते. सायबर चोरट्यांनी सुरुवातीला त्याला ऑनलाइन पद्धतीने एक काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर थोडे पैसेही दिले. ऑनलाइन टास्कमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही परत केली नाही.