पुणे : कच्चे तेल खरेदीत नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची दोन कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी दुबईत वास्तव्य करणाऱ्या तिघांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३६ वर्षीय महिला मूळच्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील आहेत. दाेन वर्षांपूर्वी आरोपींशी त्यांची ओळख झाली होती बाणेर भागातील कार्यालयात आरोपींनी महिलेला बोलावून घेतले. कच्चे तेल खरेदी विक्रीत पैसे गुंतविल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. महिलेला जाळ्यात ओढून आरोपींनी तिच्याकडून वेळोवेळी दोन कोटी ५४ लाख ८४ हजार रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर महिलेला आरोपींनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलकाा सरग तपास तपास करत आहेत.

रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना तळजाई परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक दशरथ डेंगळे (वय ४९, रा. टिळेकनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत डेंगळे यांचा मुलगा अमर (वय २३) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक डेंगळे हे शुक्रवारी (३० जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळजाई परिसरातील गायत्री सोसायटीत रंगकाम करत होते. तेथे लाकडी पाळण्याचा वापर करुन ते इमारतीला रंग लावत होते. त्या वेळी अशोक यांचा तोल गेला. तोल जाऊन पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

ठेकेदाराने सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे डेंगळे यांचा मुलगा अमर याने फिर्यादीत म्हटले आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे तपास करत आहेत.

पती, मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार

पती, मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत पीडित महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गुरु दोडमणी (वय २५), मयुर (वय २६), दीपक काटकर (वय २४, सर्व रा. लिपाणे वस्ती, सदगुरु हॉस्पिटलमागे, आंबेगाव खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय पीडित महिला, तिचे पती, लहान मुलगी आंबेगाव परिसरात राहायला आहेत. आठ महिन्यांपूर्वी आरोपी दोडमणी महिलेचा पती घरात नसताना गेला. महिलेचा पती आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या महिलेने या घटनेची माहिती कोणाला दिली नाही. त्यानंतर आरोपी दोडमणीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. दोडमणीचे मित्र मयूर आणि दीपक यांनी महिलेच्या घरी गेले. तुझी बदनामी करेल, अशी धमकी आरोपींनी तिला दिली. महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.