scorecardresearch

पुण्यात व्यावसायिकाकडून हवेत गोळीबार, तरुणांनी ‘कहा के हो?’ असे विचारल्याने झाला वाद

शेकोटी करीत बसलेल्या तरुणांनी ‘कहा के हो?’ असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणी नगरमध्ये सोमवारी रात्री घडला.

पुण्यात व्यावसायिकाकडून हवेत गोळीबार, तरुणांनी ‘कहा के हो?’ असे विचारल्याने झाला वाद
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पुणे : शेकोटी करीत बसलेल्या तरुणांनी ‘कहा के हो?’ असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणी नगरमध्ये सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

अमित सत्यपाल सिंग (वय ३१, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित सिंग यांचा आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी आहे. ते सिलीकॉन बे  या सोसायटीत रहातात. सोमवारी रात्री ११ वाजता जेवण करुन ते बाहेर फिरायला गेले होते. तेथील रस्त्याच्या शेवटी एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. सिंग हेही काही वेळ तेथे गेले. तेव्हा त्यांना या तरुणांनी ‘कहा के हो?’ अशी विचारणा केली. त्यानंतर ते परत आले.

हेही वाचा >>> पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार; २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल

 तरुण नेमके कोण आहेत, याची माहिती घेण्यासाठी ते तिकडे गेले. त्यावेळी  तरुणांनी त्यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते मोटरीतून बाहेर आले असताना  तरुणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोनसाखळी गहाळ झाली असून, तरुणांनी गाडीच्या काचा फोडल्याचे अमित यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> कात्रज उद्यानातील फुलराणी रुळावर, “एकदा ठरविले ना की मी…!” असे म्हणत वसंत मोरेंचा विरोधकांना चिमटा

त्या विरोधात नवनाथ गलांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही काही जण शेकोटी करुन शेकत बसलो असताना अमित सिंग तेथे आले. त्यांना ‘भय्या, कहा के हो?’अशी विचारणा केली. त्याचा त्यांना राग आला. ते निघून गेले. काही वेळाने ते पुन्हा मोटार घेऊन आले. त्यांनी एकाला बोलावून त्याच्यावर पिस्तूल रोखले. तेव्हा त्यांनी त्यांचा हात धरल्याने पिस्तुलातून गोळी झाडली गेली. त्यानंतर ते मोटार सोडून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चौकशी करुन दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 13:10 IST

संबंधित बातम्या