पुणे : भांडण लावल्याच्या संशयावरून बाप-लेकासह टोळक्याकडून तरुणावर वार करून त्याला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना रेंजहिल्स परिसरात घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. राजू भिकान मोरे (वय ५०, रा. औंध रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर ऋतिक मोरे याच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदीप कदम (वय ३२ रा. लोहगाव) असे गंभीर जखमीचे नाव असून, त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मोरे आणि संदीप कदम ओळखीचे असून, एकाच ठिकाणी काम करतात. केटरर्सच्या ठिकाणी संदीपने भांडण लावल्याचा संशय राजूला होता. त्याच रागातून बुधवारी (११ जून) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास खडकीतील रेंजहिल्स परिसरात टोळक्याने संदीपला गाठून त्याच्यावर वार केला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्यासह पोलीस निरीक्षक बागवे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांनी धाव घेतली. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करीत आहेत.