पुणे : डेक्कन जिमखाना परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून नेण्याच्या घटना घडल्या. घोले रस्ता, तसेच जंगली महाराज रस्त्यावर या घटना घडल्या.
घोले रस्त्यावर तरुणाचा ७० हजार रुपयांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी (९ जून) घडली. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण पाषाण भागात राहायला आहे. रात्री तो घोले रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये मित्रांबरोबर आला होता. मित्रांबरोबर जेवण करून रात्री साडेबाराच्या सुमारास तो हाॅटेलमधून बाहेर पडला. घोले रस्त्यावर तो थांबला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील ७० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करत आहेत.
जंगली महाराज रस्त्यावर एका पादचारी तरुणाचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (८ जून) घडली. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास जंगली महाराज रस्त्याने निघाला होता. एका हाॅटेलसमोर पादचारी तरुणाच्या हातातील १७ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून चोरटे पसार झाले. सहायक फौजदार करडे तपास करत आहेत.
मोबाइल हिसकाविणाऱ्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी घोले रस्ता, जंगली महाराज रस्ता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
पुणे स्टेशन परिसरात मोबाइल हिसकावला
पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह परिसरात एकाकडील मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पिंपरी-चिंचवड परिसरातील वडमुखवाडीत राहायला आहेत. शनिवारी दुपारी ते अलंकार चित्रपटगृहाजवळ थांबले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील आठ हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.