पुणे स्टेशन परिसरात गर्दीत प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून दहा लाख रुपयांचे ४६ मोबाइल संच जप्त करण्यात आले. सद्दाम कासीम शेख (वय २३, कोंढवा), अनिल अरुण बोबडे (वय २७, रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी आले कामी –

पुणे स्टेशन परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पीएमपी थांब्यांवर गर्दीत प्रवाशांकडील मोबाइल संच शेख आणि बोबडे यांनी लांबविले होते. बंडगार्डन पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चित्रीकरणात आढळलेले संशयित चोरटे सराईत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. साधू वासवानी चौकात एका प्रवाशाला धक्का देऊन त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावण्यात आल्याची घटना घडली होती.

खाद्यपदार्थ विक्रेते, पानपट्टीचालकांना संशयित चोरट्यांचे वर्णन देण्यात आले होते –

स्टेशन परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, पानपट्टीचालकांना संशयित चोरट्यांचे वर्णन देण्यात आले होते. चोरटे स्टेशन परिसरातील एका गल्लीत थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. शेख आणि बोबडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४६ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक राहुल पवार, मोहन काळे, फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अमोल सरडे आदींनी ही कारवाई केली.