पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने सन २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र ते अलीकडे आणत भारत २०२५ पर्यंत क्षयमुक्त करण्याचे ध्येय जाहीर केले. आता प्रत्यक्षात हे शक्य नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यात यंदा जानेवारी ते जूनदरम्यान तब्बल सव्वालाख क्षयरुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. यात क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच क्षयरुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपचार आणि सल्ला देण्यात येत आहे. यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांत राज्यात एकूण १३ लाख ८० हजार ४८५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १ लाख १० हजार ८९८ जणांना क्षयरोगाचे निदान झाले. हेही वाचा >>>pune crime news: सोसायटीत गोंधळ घालताना हटकल्याने सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार; बिबवेवाडी पोलिसांकडून दोघांना अटक राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आता १८ ते ६० वयोगटातील पात्र नागरिकांना बीसीजी लस देण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण केले जात आहे. केंद्रीय क्षयरोग विभागाकडून राज्यास यंदा २ लाख ५० हजार क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पावले उचलली जात आहेत. रुग्णांचे प्रमाण अधिक असून, सर्वेक्षणाचे प्रमाण कमी असल्याने २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या २०३० पर्यंतच्या मुदतीत हे ध्येय गाठणे शक्य होऊ शकते, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दर तीन मिनिटांना दोन मृत्यू क्षयरोग ही अजूनही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या आहे. देशात दर तीन मिनिटांना दोन व्यक्तींचा मृत्यू क्षयरोगाने होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. देशात क्षयरोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अपघातातील मृत्यूपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे क्षयरोगाबद्दल प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असून, लक्षणे जाणवताच आरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करणे आवश्यक असते. लक्षणे जाणवूनही उपचार घेण्याचे टाळल्यास हा रोग पसरत जातो. तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्षयरोग होण्याची शक्यता असते. हेही वाचा >>>राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम; श्रीमंत दगडूशेठ हलवाई राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर क्षयरोगाचा प्रसार हवेतून होण्याची दाट शक्यता असते. एखादा क्षयरोगी खोकत असेल, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे क्षयरोगाची लक्षणे जाणवताच उपचार घ्यावेत. तसेच रुग्णाच्या संपर्कात राहताना खबरदारी घ्यावी.- डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक, आरोग्य सेवा (क्षयरोग) राज्यातील क्षयरुग्ण महिना - सर्वेक्षण केलेले रुग्ण - बाधित रुग्ण जानेवारी - २,१५,४४५ - २०,१२३ फेब्रुवारी - २,१५,६१८ - १९,३२५ मार्च - २,३१,०८४ - १९,३१९ एप्रिल - २,३०,०८२ - १८,७१७ मे - २,४०,०७५ - १८,६५९ जून - २,४८,१८१ - १४,७५५