अभय योजनेतून पंधरा दिवसांत ३५ कोटींचे उत्पन्न

मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत पंधरा दिवसांत ३५ कोटी १८ लाखांचे उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले आहे.

पुणे : मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत पंधरा दिवसांत ३५ कोटी १८ लाखांचे उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले आहे. १६ हजार ९५२ मिळकतकर थकबाकीदारांनी दंडाच्या रकमेवरील सवलतीचा लाभ घेत मिळकतकर जमा केला आहे. अभय योजनेची मुदत २६ जानेवारी रोजी संपणार असून थकबाकीदारांना मोठय़ा प्रमाणावर कर भरणा करता यावा, यासाठी शनिवार आणि रविवार (२३ आणि २४ जानेवारी) सुटीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या दहा महिन्यात मिळकतकरातून एकूण १ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली.

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मिळकतकराची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. यंदा एक एप्रिलपासून मिळकतकर देयकाची छपाई, देयकांचे वाटप वेळेत पूर्ण करण्यात आले. तसेच पहिल्या तीन महिन्यांमध्ये ज्यांनी नियमित कर भरला आहे, त्यांना मिळकतकरामध्ये १५ टक्के सवलत देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून मिळकतकर वसुलीसाठी मोहीम आखण्यात आली असून व्यावसायिक वापर असलेल्या मिळकतींच्या थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा सुरू झाला आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३ हजार व्यावसायिक मिळकतींची अटकावणी करण्यात आली असून व्यावसायिक मिळकतकरधारकांनी ३३ कोटी ३९ लाख रुपयांचा कर जमा केला आहे. तसेच काही मिळकतधारकांनी २१  कोटींच्या रकमेचे धनादेश कर आकारणी आणि कर संकलन विभागाल दिले आहेत, अशी माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

सुटीच्या दिवशी कर भरणा सुविधा

अभय योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षकांची पथके तयार केली आहेत. निवासी थकबाकीदाराच्या घरी संपर्क साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अनेक मोठय़ा गृह संकुल प्रकल्पांमध्ये जनजागृतीसाठी मेळावे घेण्यात आले आहेत. गेल्या शनिवार आणि रविवारीही कर भरणा केंद्रं सुरू ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे येत्या शनिवार आणि रविवारीही केंद्रं सुरू राहणार आहेत. थकबाकीदारांनी कर भरावा, असे आवाहन मिळकतकर विभागाकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Income tax arrears abhay yojana ysh

Next Story
परदेशस्थांना मराठीचे विनामूल्य ऑनलाइन धडे
फोटो गॅलरी