पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या घरावर मंगळवारी आयकर विभागाने छापा टाकला. येथील बाणेर परिसरातील वीरभद्र नगरमध्ये बाबुराव चांदेरे यांचे घर आहे. या ठिकाणी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास आयकर विभागाचे पथक येऊन धडकले. सध्या हे अधिकारी चांदोरे यांच्या घरी चौकशी करत आहेत. बाबुराव चांदोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. बाबुराव चांदोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभाग आणि पोलिसांचे पथक अजूनही याठिकाणी उपस्थित असून चांदेरे यांची चौकशी केला जात आहे. मात्र, या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.