पुणे : गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचे गंभीर परिणाम भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. ‘प्रयास’ या पुणेस्थित संस्थेने उष्णतेच्या लाटेचे आरोग्यावरील परिणाम अभ्यासणाऱ्या काही संशोधनांतून याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. त्यात उष्णतेमुळे गंभीर आजार आणि मृत्यू ओढवण्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े

  ज्येष्ठांमध्ये उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या परिणामांचे प्रमाण अधिक आहे. शेतकरी, शेतमजूर, रस्ते आणि बांधकामांवर असणारे मजूर यांच्यामध्ये उष्णतेचे परिणाम आणि विकार अधिक असल्याचे दिसून आले आहे. पत्र्याचे छप्पर असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना उष्माघात होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे, असे ‘प्रयास’ने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आह़े

 गेल्या काही वर्षांपासून उष्माघाताचे संकट अधिकाधिक गडद होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाही महाराष्ट्रासह देशभरामध्ये नागरिक त्याचा अनुभव घेत आहेत. उष्माघात हा विकार वरवरचा नसून, त्यामुळे नागरिक आपले जीवही गमावत आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, ओडिशा, पंजाब या राज्यांमध्ये उष्माघाताने दगावणाऱ्या नागरिकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. त्याचवेळी इतर राज्यांमध्ये महापूर, वीज पडणे किंवा वादळांमुळे नागरिक दगावत आहेत. देशभरामध्ये उष्माघाताचे परिणाम अभ्यासण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनांमधून उष्णतेची लाट हे मृत्यूचे कारण ठरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निष्कर्षांमधून समोर आले आहे. मृत्यू ओढवण्याबरोबरच अनेक सर्वसामान्य आणि गंभीर विकारांचा सामनाही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना करावा लागत आहे.

सर्वसामान्य विकारांमध्ये प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, थकवा, डोकेदुखी, उलटय़ा, भूक मंदावणे, चक्कर येणे, त्वचाविकार यांचे प्रमाण लक्षणीय आहे. रक्तदाब किंवा नाडीचे ठोके मंदावणे हेही बहुसंख्य रुग्णांमध्ये दिसून येत आहे. त्यातून नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणामही चिंतेचे कारण आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 कामाच्या स्वरूपानुसार उष्णतेच्या लाटेचे वेगवेगळे परिणाम नागरिकांमध्ये दिसतात. थेट सूर्यप्रकाशात कष्टाची कामे करणाऱ्यांमध्ये उष्माघाताचे विकार आणि गांभीर्य यांचे प्रमाण अधिक आहे. अवजड आणि शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्यामध्ये उष्माघाताच्या विकारांची तीव्रताही अधिक आहे. मात्र, ज्या महिला अशी कामे करतात त्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे पाणी कमी पित असल्याची तक्रार करतात. त्याचे दूरगामी परिणाम महिलांच्या जीवनचक्रावर दिसतात, असे प्रयासच्या अभ्यासातून समोर आले आहे.

जीवितहानी, आजारांवर नियंत्रणाचा प्रयत्न

पुढील काळात तापमानाच्या पाऱ्याची तीव्रता वाढत जाणार हे निश्चित आहे. या परिणामांचा सामना करण्यासाठी आपली तयारी परिपूर्ण असेल, योजना अभ्यासपूर्ण माहितीवर आधारित असतील आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ असेल तर जीवीतहानी आणि आजारांची तीव्रता नियंत्रणात ठेवता येईल. त्यासाठी हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ‘प्रयास’ संस्थेच्या डॉ. रितू परचुरे यांनी सांगितल़े.

कोकणात पावसाचा अंदाज, उर्वरित राज्यात तापमानवाढ

पुणे : कोकणच्या काही भागांत पुढील तीन दिवस हलका पाऊस हजेरी लावणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांत उष्णतेची लाट कायम राहिली आहे. बुधवारी राज्यात अकोला येथे सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.