पुणे : करोना प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असला तरी हिऱ्यांच्या उलाढालीत देशामध्ये तब्बल २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्या-चांदीचे वाढते दर ध्यानात घेता केवळ भारतामध्येच नाही तर अमेरिका आणि चीन या देशांमध्येही हिरे खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याची आकडेवारी बोलकी आहे.
या नवीन पिढीच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता ‘डी बिअर्स’ने ‘कोड ऑफ ओरिजीन’ हा विश्वसनीय हिऱ्यांसंबंधीचा उपक्रम १८९ वर्षांची परंपरा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या महाराष्ट्र आणि गोव्यामधील दालनांमध्ये सादर केला आहे. त्यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ‘डी बिअर्स इंडिया‘चे व्यवस्थापकीय संचालक सचिन जैन यांनी दिली.
करोना प्रादुर्भाव ओसरल्यानंतर बाजारपेठा खुल्या झाल्या आणि केवळ श्रीमंतच नव्हे तर, मध्यमवर्गीय ग्राहकांचाही हिरे खरेदी करण्याकडे कल असल्याचे जाणवले. २०२१ मध्ये हिरे व्यापारासंदर्भात अमेरिकेमध्ये ३२ टक्के आणि चीनमध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली. तर, भारतामध्ये हिऱ्यांच्या उलाढालीमध्ये तब्बल २२ टक्क्यांची वाढ झाली. २०१९ या वर्षांच्या तुलनेमध्ये ही वाढ दहा टक्क्यांनी अधिक असल्याचे जैन यांनी सांगितले. ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ या वेळी उपस्थित होते.
जैन म्हणाले, करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून खाणकाम, हिऱ्यांचे उत्पादन, दागिन्यांची निर्मिती आणि व्यापार हे सारे व्यवहार ठप्प झाले होते. ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडू शकत नव्हता. मात्र, ऑगस्ट २०२० मध्ये बाजारपेठ खुली झाल्यानंतर हिरे उद्योगामध्ये पु्न्हा एकदा पैसा खेळू लागला. करोनामुळे काही विवाह लांबणीवर पडले. तर, काही विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. विवाहावर होणाऱ्या खर्चामध्ये झालेली बचत ही हिरे खरेदीसाठी पथ्यावर पडली. याच कालखंडामध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणून मध्यमवर्गीयांचा पैसा ‘वेडिंग ज्वेलरी’ खरेदीकडे वळाला आणि त्यामध्ये हिरे खरेदी करण्यावर भर दिला गेला, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.

नेकलेसमध्ये हिऱ्याचे पदक आणि मंगळसूत्रामध्ये हिरा यासाठी महिला वर्गाकडून तर, अंगठी आणि कडे (ब्रेसलेट) या दागिन्यांसाठी युवा वर्गामध्येही हिरा खरेदी करण्याचे आकर्षण आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करण्यापेक्षा हिरा खरेदी करण्याला गेल्या चार महिन्यांमध्ये प्राधान्य दिले जात आहे. ५० हजार रुपयांपासून ते ५० लाख रुपये किमतीपर्यंतचे हिरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.-सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स