scorecardresearch

पुण्यात बदलत्या हवामानामुळे ताप, कोरड्या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे असलेली रुग्णसंख्याही दिसून येत आहे. बहुतेक मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना या वारंवार होणाऱ्या हवामान बदलांचा त्रास होताना दिसून येत आहे.

पुण्यात बदलत्या हवामानामुळे ताप, कोरड्या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
पुण्यात बदलत्या हवामानामुळे ताप, कोरड्या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कोरडा खोकला, सर्दी, विषाणूजन्य ताप आणि उलट्या अशा लक्षणांच्या रुग्णांचे बाह्यरुग्ण विभागात येण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे निरीक्षण शहरातील डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे. साधारण आठवड्याभरापेक्षा अधिक काळ ही रुग्णवाढ दिसत असून या रुग्णांमध्ये प्रामुख्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

हेही वाचा- पिंपरी : तब्बल २७ वर्षांनी सापडला मारेकरी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दापोडीत १९९५ ला केली होती पत्नीची हत्या

बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे असलेली रुग्णसंख्याही दिसून येत आहे. बहुतेक मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना या वारंवार होणाऱ्या हवामान बदलांचा त्रास होताना दिसून येत आहे. त्यामुळे जनरल फिजिशियनच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारण आठ ते १० रुग्ण औषधोपचारांसाठी येत आहेत.

अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे डॉ. सम्राट शहा म्हणाले, ऋतू बदलत असताना विषाणूजन्य संसर्गांमध्ये वाढ होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्दी, खोकला, अपचन, तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारांसाठी येत आहेत. सर्दी, ताप आणि खोकला अधिक दिवस राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात नागरिकांनी योग्य काळजी न घेतल्यास संसर्गजन्य आजारांची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी लवकरात लवकर उपचार करून घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. शहा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- पुणे :शहरीकरणाचा वेग, हवामान बदलांविषयी जी-२० परिषदेच्या बैठकांमध्ये चिंता; शाश्वत शहरांसाठीच्या पाच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

मदरहूड रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे म्हणाले, आजारी व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून उडालेले विषाणू हे हिवाळ्यातील कोरड्या हवेत जलदगतीने संसर्गाचे संक्रमण करतात. त्यामुळे साहजिकच संसर्गाचा वेगही लक्षणीय असतो. नागरिक घरी एकत्र येतात किंवा प्रवासाच्या निमित्ताने गर्दीत मिसळतात. संसर्गाच्या प्रसाराला त्यामुळे अधिक चालना मिळते. हिवाळ्यातील आजाराची लक्षणे सर्वच रुग्णांमध्ये दिसून येतातच असे नाही. अनेकदा ती अत्यंत सौम्य असतात मात्र आजारी पडल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत अशा व्यक्ती इतरांना संसर्गाचे संक्रमण करू शकतात. लहान मुलांना कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विलंब करू नये, असेही डॉ. काथवटे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- राज्यात थंडीचा मुक्काम कायम; सलग १५ दिवस जळगावचे तापमान राज्यात निचांकी

जोखीम गट कोणता?

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण हे प्रामुख्याने अशा आजारांबाबत जोखीम गटात मोडतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिला यांनी खोकला आणि ताप यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेह, मूत्रपिंड विकार आणि कर्करोगाचे रुग्ण, उच्चरक्तदाब, हृदयविकाराचे रुग्ण यांनी प्रत्येक ऋतू बदलाच्या काळात विशेष काळजी घेण्याची गरज असते. घरी केलेला ताजा आणि चौरस आहार, भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. पाच दिवसांपेक्षा अधिक काळ ताप, खोकला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 10:48 IST

संबंधित बातम्या