पुणे : सतत वाढत असलेल्या उन्हामुळे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली असून, एक एप्रिलपासून आतापर्यंत आग लागण्याच्या ६०० पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. यामध्ये घरगुती आग, विजेच्या उपकरणांमुळे लागलेली आग (इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट), कचरा, गॅस गळती, ऑइल गळती आणि काचेमुळे लागलेल्या आगींचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत आगीच्या १९७१ घटना घडल्या होत्या.
तापमानातील वाढीमुळे वेगवेगळ्या माध्यमांतून आग लागण्याचे प्रकार वाढत असून, नागरिकांनी दक्ष राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले आहे. आग लागण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे, आगीच्या घटना घडल्यास तातडीने अग्निशमन दलाला कळवावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत शहर व परिसरात मार्च आणि एप्रिलमध्ये आगीच्या घटना वाढत आहेत. शहराच्या विस्तारामुळे सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे. इमारती उभारण्यासाठी सर्रास झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे तापमानातही वाढ होत आहे. उष्णतेमुळे तापमान वाढल्यानंतर शॉर्टसर्किट आणि गवत, कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे निरीक्षण अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये आगीच्या १४७२ घटना घडल्या होत्या, यंदाच्या जानेवारी ते मार्चमध्ये हा आकडा १९७१ वर गेला. तर, २०२४ च्या एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे ६३२ आणि ८२० प्रकार घडले होते, यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अनुक्रमे ६४० आणि ७७६ आगीच्या घटना घडल्या असून, एप्रिलमध्ये ६०५ घटना घडल्या.
तापमान वाढल्याने आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. काही ठिकाणी सुकलेला पालापाचोळा जाळण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेही आग लागते. घरातील जुनी वायरिंग, उष्णतेमुळे पंखा तसेच कुलर, वातानुकूलन यंत्रणा (एसी) याचा सततचा वापर यामुळेही विद्युत यंत्रणेवर ताण येतो आणि आग लागते. – विजय भिलारे, (सहायक अग्निशमन अधिकारी)
ही काळजी घ्या…
– इमारतीच्या जवळ पालापाचोळा, सुका कचरा पेटवू नका.
– घरातील विद्युत यंत्रणा, वायरिंग यांची उन्हाळ्यात तपासणी करून घ्या.- इमारतींमध्ये असलेल्या यंत्रणेची तपासणी करा.
– घरातील पंखे, वातानुकूलन यंत्रणा, कूलर सतत सुरू ठेवू नका.- ठरावीक वेळेनंतर पंखा, कुलर बंद करा.
– इमारतीत अडगळीत ठेवलेल्या वस्तू काढून टाका.
– आग लागण्याच्या घटना घडल्यास तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधा.
गेल्या तीन वर्षांतील आगीच्या घटनांची आकडेवारी
वर्ष – जानेवारी – फेब्रुवारी – मार्च – एप्रिल
२०२३ – ५०२ – ५२२ – ४८२ – ५७५
२०२४ – ४२५ – ४७९ – ५६८ – ६३२
२०२५ – ५५५ – ६४० – ७७६ – ६०५ (२७ एप्रिलपर्यंत)