लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून नावलौकिक असलेल्या, मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुद्द्यांची नवी संस्कृती उदयाला आली आहे. गेल्या काही काळात विद्यापीठात विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांमधील हाणामारीच्या घटना सातत्याने होत असून, या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत राजकारणासह जात-धर्माच्या मुद्द्यांवर हिंसक घटना होत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील आघाडीचे विद्यापीठ आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसह परराज्यातील आणि परदेशातील विद्यार्थीही या विद्यापीठात प्रवेश घेतात. मात्र गेल्या काही काळात विद्यापीठात हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. त्यात विद्यार्थी संघटनांमध्ये सदस्य नोंदणीवरून वाद होऊन मारामारी, ललित कला केंद्रातील नाट्यसादरीकरणावरून वाद आणि तोडफोड, व्हॉट्सॲपवरील पोस्ट डिलिट केली म्हणून विद्यार्थ्याला मारहाण असे प्रकार गेल्या काही महिन्यांत घडले. तर नुकताच ‘लव्ह जिहाद’चा आरोप करून एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. अशा प्रकरणांमुळे विद्यापीठातील वातावरण गढूळ झाले आहे.

आणखी वाचा-एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?

पूर्वी विद्यापीठात हिंसक घटनांचे प्रकार अपवादाने व्हायचे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये त्यात वाढ होत आहे. अशा घटनांमुळे विद्यापीठाची राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अप्रतिष्ठा होते. भविष्यात त्याचा परिणाम प्रवेश, विद्यापीठाची क्रमवारी यावरही होऊ शकतो. हिंसक घटनांमुळे विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणही बिघडले आहे. तसेच सेल्फ सेन्सॉरशीपसारखी स्थिती निर्माण झाली आहे. असे प्रकार अजिबातच होता कामा नयेत, ही परिस्थिती कुठवर जाणार हे कळत नाही, व्यवस्था म्हणून खच्चीकरण होत आहे, अशी भावना विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी व्यक्त केली.

सुरक्षा व्यवस्थेवर करोडोंचा खर्च

विद्यापीठाकडून सुरक्षा व्यवस्थेवर करोडो रुपये खर्च केले जात आहेत. सर्वत्र सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक असूनही हाणामारीच्या घटना होतच असल्याने ही व्यवस्था काय कामाची असा प्रश्न विचारला जात आहे.

आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल

गेल्या काही काळात विद्यापीठातील वादविवादांच्या घटना वाढल्या आहेत हे खरे आहे. विद्यार्थी संघटनांसाठी कार्यपद्धती निश्चित केली होती. मात्र त्याला विरोध झाल्याने ती स्थगित करावी लागली. अशा घटना घडू नयेत हाच विद्यापीठ प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. -डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मारामारीच्या घटनांमागे जुने हेवेदावे, प्रसिद्धीसाठी समाजमाध्यमांचा वापर करून गर्दी जमवणे, राजकीय हस्तक्षेप असे प्रकार होत असू शकतात. हे प्रकार रोखण्यासाठी शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. तसेच विद्यापीठाचे ओळखपत्र गळ्यात असणे अशी सक्तीची शिस्तही असली पाहिजे. जेणेकरून विद्यापीठातील विद्यार्थी आणि बाहेरच्या व्यक्ती ओळखता येतील. या घटनांमागे बाहेरचा हस्तक्षेप नाही ना, याचा तपास केला पाहिजे. तसेच विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला बाधा येणार नाही याची खबरदारी विद्यापीठातील आणि विद्यापीठाबाहेरील संबंधितांनी घेतली पाहिजे. -डॉ. अरूण अडसूळ, माजी कुलगुरू

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in violent incidents among students and student unions at savitribai phule pune university pune print news ccp 14 mrj
First published on: 10-04-2024 at 10:59 IST