पुणे : शहरात मे महिन्यापासून जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ आणि विषमज्वराचे रुग्ण आढळून येत आहेत. दूषित पाणी अथवा अन्नामुळे या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
शहरात यंदा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यामुळे तेव्हापासून जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये जास्त वाढ होऊ लागली आहे. शहरात जानेवारी ते मे या कालावधीत जलजन्य आजारांचे एकूण ५ हजार ६१७ रुग्ण आढळले असून, त्यात सर्वाधिक ४ हजार २९२ रुग्ण तीव्र अतिसाराचे आढळले आहेत. याच वेळी आमांशाचे १०२, कावीळ ६६, विषमज्वर ८६, लेप्टोस्पायरोसिस २, जुलाब ९७४, गॅस्ट्रोचे ९५ रुग्ण आढळले आहेत. मात्र, या वर्षी कॉलराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. यात अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून ते दूषित झाल्यास उलट्या, जुलाब असा त्रास होत आहे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात अशा आजारांचे प्रमाण वाढते. मात्र, या वेळी मे महिन्यातच जोरदार पाऊस सुरू झाल्याने तेव्हापासून या आजारांचे प्रमाण वाढले आहे. उलट्या, जुलाब, विषमज्वर हे आजार झाल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत हे उपचार उपलब्ध आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
काळजी काय घ्यावी?
– महापालिकेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा.
– शुद्धीकरण न केलेले, कूपनलिका, विहीर, कालव्याचे पाणी पिऊ नये.
– शिळे अथवा माशा बसलेले अन्न खाऊ नये.
– जेवणापूर्वी आणि शौचाहून आल्यानंतर हात साबण आणि पाण्याने धुवावेत.
– पाणी गाळून व २० मिनिटे उकळून व नंतर थंड करून प्यावे.
– पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करून स्वच्छ करावेत.
– इमारतीतील पाण्याची टाक्यांची सफाई करावी.
महापालिकेच्या दवाखान्यात साथरोगांवरील औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिसार, विषमज्वर, कॉलरा, कावीळ या आजारांचे रुग्ण आढळल्यास खासगी डॉक्टरांनी याची माहिती तातडीने आरोग्य विभागाला द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. – डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका