‘‘पुण्यातील चाळीस लाख लोकसंख्येला पाणी पुरवताना पाणीसाठय़ातील पन्नास टक्के पाणी घरगुती वापरासाठीच जाते. लोकसंख्या अशीच वाढत राहिली, तर सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाणी पुरवणे अवघड होईल. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा वापर कमी करणे हे आव्हान आहे,’’ असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांनी व्यक्त केले.
‘सीराम’ (सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन रीसर्च अँड मॅनेजमेंट) या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सांडपाणी तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी सुर्वे बोलत होते. ब्राझीलमधील जलसंशोधक ऐला सिल्व्हा, पुणे महापालिकेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, ‘इंडियन वॉटरवर्क्स असोसिएशन’ चे अध्यक्ष व्ही. आर. कल्याणकर, ‘सीराम’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंगेश कश्यप, उपाध्यक्ष डॉ. सुधांशू गोरे या वेळी उपस्थित होते.
सुर्वे म्हणाले, ‘‘आपल्याला पाणी व्यवस्थापनाची आठवण केवळ पाण्याच्या टंचाईच्या वेळेसच होते. हा दृष्टिकोन बदलायला हवा. पाणीपुरवठा योजनांची आखणी करताना पुढील काही दशकांचा विचार करूनच त्या आखल्या गेल्या पाहिजेत. पाणीपुरवठय़ादरम्यान होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाला अटकाव करण्यासाठी पाणीपुरवठय़ाची कॅनॉल पद्धत बदलून जलवाहिनी (पाइपलाइन) पद्धत वापरणे आवश्यक आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीची गरज लागणार आहे. मात्र येत्या काही दशकांत हे प्रत्यक्षात यायला हवे. गेली चारपाच वर्षे पाऊस उशिरा येत असल्याने सुमारे १५ जुलैपर्यंत पुण्यासाठी आधीच्या पाणीसाठय़ातील ३ टीएमसी पाणी राखून ठेवावे लागते. पावसाची अनिश्चितता आणि वाढती लोकसंख्या ही आव्हाने आहेत. भूजलाच्या वापरावर नियंत्रण नसणे हे देखील एक मोठे आव्हान आहे. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सिंचन व स्वच्छतागृहांसाठी वापरता येणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्र हे एकमेव क्षेत्र पाण्याच्या पुनर्वापराविषयी गांभीर्याने विचार व प्रयत्न करते आहे.’’
ऐला सिल्व्हा यांनी सांगितले, की ‘ब्रिक्स’ देशांच्या संघटनेतील देश पाण्याबाबतच्या समान समस्यांना सामोरे जात आहेत. पाणी आणि पर्यावरणीय समस्यांचा सामना करण्यासाठी देशांच्या परस्पर सहकार्याची गरज आहे. पाणी व्यवस्थापनासाठी भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला पर्याय नाही. यासंबंधीची संशोधने तरुण पिढीकडूनच येऊ शकतील. सरकार आणि सामाजिक संस्थांनी पाणी व्यवस्थापनासाठी भागीदारीत काम करायला हवे. प्रत्येक व्यक्तीने आपल्यापुरत्या प्रयत्नांतूनच पाणी व्यवस्थापनाची सुरुवात करणे आवश्यक आहे.