||राहुल खळदकर

पुणे : महंमदवाडी-कौसरबाग या प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र विकासाच्या दृष्टीने हा भाग दुर्लक्षितच राहिला असल्याची वस्तुस्थिती आहे. नागरिकीरणाचा वाढता वेग लक्षात घेऊन विकास आराखड्यासाठी रस्ते आखण्यात आले. मात्र ते कागदावरच राहिले आहेत. रखडलेले रस्ता रुंदीकरण, पर्यायी रस्त्यांचा अभावामुळे नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत असून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात गेल्या चार वर्षांत नगरसेवकांना यश आलेले नाही. भूसंपादनाअभावी रस्ते रखडले आहेत.

महंमदवाडी गावाचा समावेश १९९७ मध्ये पुणे महापालिकेत झाला. प्राची आल्हाट आणि प्रमोद भानगिरे हे शिवसेनेचे नगरसेवक असून नंदा लोणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर संजय घुले भारतीय जनता पक्षाचे या प्रभागातील नगरसेवक आहेत. महंमदवाडी-कौसरबाग भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढले. महंमदवाडीच्या तुलनेत अन्य भागांचा विकास वेगाने झाला. लष्करी अधिकारी, उच्चभ्रूंची वसाहत असलेला कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसराचा विकास वेगाने झाला. मात्र, उर्वरित भागाचा विकास संथगतीने सुरू आहे. महंमदवाडी गावात आजही शेतजमीन असून तेथे नव्याने गृहप्रकल्प साकारण्यात येत आहेत. ज्या भागात गृहप्रकल्प तेथील विकास पहिल्यांदा होत आहे. महंमदवाडी गाव काँक्रीटच्या जंगलात हरवलेले आहे. या भागातून पुणे शहराकडे जाणाऱ्या रस्त्याची तरतूद विकास आराखड्यात करण्यात आली आहे. मात्र, महंमदवाडीतील ग्रामस्थांना शहराकडे जाणारा हक्काचा रस्ता न मिळाल्याने आडमार्गाने जावे लागत आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्याच्या तुलनेत या भागाचा विकास संथगतीने होत असल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

महंमदवाडी परिसरात कचऱ्याची समस्या आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. काही भागात पाणी येते मात्र, काही भागात पाणीटंचाई आहे. तेथे कमी दाबाने पाणी येते. ज्या भागात बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे. त्या भागातील विकासावर लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले आहे, असे या भागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एनआयबीएम रस्ता परिसरात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने झाला. मात्र, महंमदवाडी गाव परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. एकीकडे उच्चभ्रूंची वस्ती आहे. याच प्रभागात साठेनगर, कृष्णानगर झोपडपट्टी आहे. तेथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महंमदवाडीचा समावेश पुणे महापालिकेत होऊन बावीस वर्ष उलटली असली, तरी तेथील ग्रामस्थांना पुणे शहराकडे जाण्यास हक्काचा रस्ता नाही. विकास आराखड्यात डीपी रस्त्याची तरतूद आहे. मात्र, भूसंपादन आणि अन्य प्रक्रियांमध्ये डीपी रस्ता कागदावरच आहे. लोकप्रतिनिधींनी डीपी रस्ता मार्गी लावण्यास फारसे प्रयत्न केले नाहीत. अरुंद रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे.

नागरिक म्हणतात

महंमदवाडी भागात कचऱ्याची समस्या आहे. रस्ते कच्चे आहेत. त्यामुळे पदपथ असण्याचा प्रश्न नाही. या भागातील सांडपाणी वाहिन्यांची कामे रखडलेली आहेत. पिसोळीपासून येणाऱ्या ओढ्याला सीमाभिंत बांधणे गरजेचे आहे. विकास आराखड्यात डीपी रस्ता मंजूर असून अद्याप पुणे शहराला जोडणारा रस्ता झालेला नाही. महंमदवाडी भाग म्हणजे काँक्रीटच्या जंगलातील एक गाव आहे. एनआयबीएम रस्त्यावरील कामे झाली आहेत. त्यातुलनेत महंमदवाडी ग्रामस्थांच्या वाटेला कायम उपेक्षा आली आहे. – एम. एन. कोंढाळकर, शतायू ज्येष्ठ नागरिक संघ

डीपी रस्ते मंजूर आहे. पण त्यांची कामे मार्गी लागले नाहीत. नवीन गृहप्रकल्पाचे काम सुरू झाले की तेथील रस्त्याचे काम लगेच होते. गावठाणातील रस्ते खराब आहे. काळेपडळ रवी पार्क परिसरातील रेल्वे भुयारी मार्ग आहे. त्याचे काम संथगतीने सुरू आहे. अ‍ॅमिनेटी स्पेस भरपूर आहेत. मात्र, क्रीडांगण, उद्यान नाहीत. लोकसंख्येचा मानाने या भागात सुविधांची वानवा आहे. – संदीप घुले

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

१९९७ मध्ये महंमदवाडी भागाचा समावेश महापालिकेत करण्यात आला. पुणे शहराकडे जाणाऱ्या एकाही रस्त्याचे काम अद्याप मार्गी लागले नाही. हे मार्ग नकाशावर आहे. इच्छाशक्तीचा अभाव असल्याने महंमदवाडी भागाचा पुरेसा विकास झाला नाही. आजही महंमदवाडी भागात शेतजमीन आहे. आमच्या प्रभागात सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.            – अमित घुले, काँग्रेस</strong>

गेल्या चार वर्षांत नागरिकांचे हित विचारात घेऊन एकही काम झाले नाही. विकास आराखड्यातील तरतुदीत असलेला एकसुद्धा डीपी रस्ता झाला नाही. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. मात्र, एकाही टाकीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. सोसायट्यांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यात अपयश आले आहे. – फारूक इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकप्रतिनिधी म्हणतात

महंमदवाडी गावात पुणे शहरातील सर्वांत मोठे समाजमंदिर बांधण्यात आले आहे. काही दिवसात त्याचे लोकार्पण होणार आहे. महंमदवाडी ग्रामस्थांना स्वत:चे उद्यान नव्हते. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर २३ वर्षांनी या भागात उद्यान साकारण्यात आले असून काम अंतिम टप्प्यात आहे. जेसीएमपीएमकडून काळेपडळकडे जाणारा डीपी रस्ता पूर्णत्वास नेला तसेच प्रभागातील अनेक महत्त्वांकाक्षी प्रकल्प साकारण्यात आले आहे.

– प्राची आल्हाट, नगरसेविका

हांडेवाडी येथील रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. डीपीएस स्कूल ते हांडेवाडी दरम्यानचा विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महंमदवाडी भागातील आर्केड पॅलेसपासूनच्या रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येत होते. हडपसर भागातील जेएसपीएम परिसरातील फुटबॉल मैदान, काळेपडळ येथे उद्यान, बॅडमिंटन हॉलचे काम पूर्ण झाले आहे. चौकांचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. – प्रमोद भानगिरे, नगरसेवक

एनआयबीएम रस्त्याचा पाणीप्रश्न सोडविण्यात आला आहे. या भागात उंड्री रस्ता आणि एनआयबीएम रस्त्यावर उद्यान साकारण्यात आले आहे. या भागातील नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात वेगाने येणारे पाणी सोसायट्यांच्या आवारात शिरायचे. संरक्षक भिंत बांधणे तसेच पाणी वाहून जाण्यासाठी यंत्रणा (स्ट्रॉम वॉटर लाइन) बांधण्यात आली. एनआयबीएम रस्त्यावरील स्मशानभूमीत आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली. त्यामुळे तेथून बाहेर पडणारा धूर कमी झाला. या भागातील रस्ते तयार करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्यांच्या वसाहतीतील प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात आले. – नंदा लोणकर, नगरसेविका

साळुंके विहारहून येणाऱ्या डीपी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. काळेपडळ भागात लोकनेते गोपीनाथ मुंडे उद्यान विकसित करण्यात आले. महंमदवाडीतील तरवडे वस्तीत अग्निशमन केंद्र उभे करण्यात आले आहे. या केंद्रासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात अग्निशमन केंद्राचे काम सुरू होईल. दोराबजी मॉल तसेच देसाई रुग्णालय परिसरातील टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या वर्षभरात तेथील पाणीटंचाईची समस्या मार्गी लागेल. काळेपडळ येथील रेल्वेफाटक परिसरात होणारी कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. – संजय घुले, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

डीपी रस्त्यांची कामे रखडली

प्रभाग वाटून नगरसेवकांकडून कामे

पिण्याच्या पाण्यात

सांडपाणी

पाणीटंचाई; कमी दाबाने पाणीपुरवठा

कचऱ्याची समस्या

काळेपडळ भागात वाहतूक समस्या

सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, भीमनगर,  साठेनगर, चिंतामणीनगर, काळेपडळ,  कृष्णानगर, न्याती इस्टेट, कौसरबाग, हांडेवाडी रस्ता, एनआयबीएम रस्ता

नगरसेवकांचे दावे

  • पाणीटंचाई वर्षभरात मिटेल
  •  रखडलेल्या रस्त्यांच्या कामांचा पाठपुरावा
  •   ओढे,नाल्यालगतच्या सीमाभिंत बांधण्याचे काम
  •   काळेपडळ रेल्वे फाटक परिसरात भुयारी मार्ग
  •   महंमदवाडीत अग्निशमन केंद्र
  •   प्रभागात उद्यान, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न