मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान

बारामती : इन्क्युबेशन सेंटरला मराठीमध्ये उबवणी केंद्र म्हणतात. आमची गेली पंचवीस वर्षे अंडी उबविण्यातच गेली. त्यातून जे बाहेर आले ते तुमच्यासमोरच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळून भाजपसमवेतच्या युतीबाबत मंगळवारी खोचक विधान केले. दिवाळीत काही जण फटाके फोडू इच्छित आहेत. जे फटाके तुम्हाला फोडायचे आहेत ते फोडा , पण धूर काढू नका. कारण करोना अजून संपलेला नाही, अशी टिपणी करीत ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

बारामती येथील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर या इमारतीचे उद्धाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी, अतुल किर्लोस्कर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे, राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या वेळी उपस्थित होत्या.

संपूर्ण पवार कुटुंबीयच विकासाच्या ध्यासात रमले आहे. विकास कामांसाठी आम्ही जरूर एकत्र येऊ, असे ठाकरे म्हणाले.

शरद पवार म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या दोन संस्थांच्या माध्यमातून आम्ही शून्यातून कामाला सुरुवात केली. पूर्वी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. उपलब्ध पाण्याच्या थेंबांथेंबाचा शेतीसाठी उपयोग कसा करता येईल यासाठी डॉ. अप्पासाहेब पवार यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाला गती दिली.

शेती, शिक्षण आणि साहित्य या तीन विषयांसाठी शरद पवार विद्यावृत्ती सुरू करणार असल्याचे सुळे यांनी जाहीर केले. अजित पवार, बाबा कल्याणी, अतुल किर्लोस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.