इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार भरत शहा हे १२७ मतांनी विजयी झाले. या पक्षाला २० पैकी १४ जागा मिळाल्या असून, या नगर परिषदेवर पुन्हा एकदा भरत शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध झाले.
कृष्णा भीमा विकास आघाडीला सहा जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
शहा यांच्या उमेदवारीला गारटकर यांनी विरोध करून पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शहा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले. राजकीय प्रतिस्पर्धी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्याशी गारटकर यांनी हातमिळवणी केली. ‘कृष्णा–भीमा विकास आघाडी’च्या वतीने गारटकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिली होती. गारटकर आणि शहा यांच्यात सरळ लढत झाली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, गारटकर आणि प्रवीण माने हे तिघे एकत्र आल्याने या नगर परिषदेत राजकीय समीकरणे बदलली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने वर्चस्व सिद्ध केले.
