इंदापूर : लग्नाला अवघे ११ महिने झालेले असताना आणि पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २१ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे घडली. जमीन खरेदीसाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीवरून विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली समाधान चंदनशिवे (वय २१, रा. वडापुरी, ता. इंदापूर, मूळ रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असेआत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती, सासू आणि सासरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोनालीचा विवाह २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला होता. सोनालीचे वडील हनुमंत श्रीपती बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाहानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून जमीन घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्याचा तगादा सुरू झाला. ही रक्कम आणण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर सोनालीला शिवीगाळ, मारहाण तसेच उपाशी ठेवून त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या छळाची माहिती सोनालीने माहेरी आल्यानंतर वडिलांना दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सोनालीने वडापुरी येथील राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती तिच्या सासरच्या मंडळींनी नातेवाईकांना दिली. घटनेची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी इंदापूरकडे धाव घेतली. सोनालीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या सोनालीच्या नातेवाईकांनी आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.