तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना

पुणे : करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात मुलांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालये राखीव ठेवण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. करोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेत धावपळ करावी लागू नये, म्हणून तातडीने पायाभूत सुविधा उभाराव्यात, अशी सूचनाही त्यांनी या वेळी के ली.

पुण्यातील करोना सद्य:स्थिती आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय लहान मुलांना उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना के ली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेनेही अशा प्रकारची स्वतंत्र व्यवस्था करण्याची सूचना के ली आहे. आगामी काळात प्राणवायू, रेमडेसिविर आणि लसीकरणासाठी नागरिकांना धावपळ करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा उभाराव्यात. त्यानुसार दळवी आणि ससून रुग्णालयांत प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.’

राज्याकडील लशींचा पुरवठा वाढवण्यासाठी सीरम इन्स्टिटय़ूटचे अदर पूनावाला यांच्याशी संपर्कात असून ते सध्या परदेशात आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून यावर मार्ग काढणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

दोषी रुग्णालयांवर कारवाई करावैद्यकीय देयकासाठी मृतदेह अडवून ठेवणे, रेमडेसिविर इंजेक्शनचा गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करून दोषी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी दिले.