पुणे : बाळाच्या जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत बाळाला केवळ आईचे दूध देण्याचे प्रमाण देशात लक्षणीयरीत्या घटल्याचे वास्तव समोर आले आहे. जनजागृतीचा अभाव, करिअरच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि उशिरा राहणारी गर्भधारणा यामुळे अशा बालकांचे प्रमाण ६३.७ टक्क्यांवरून ५५.८ टक्क्यांवर घसरले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस-६) ताज्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
स्तनपानाचे माता आणि बालकाच्या आरोग्यासाठी असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि स्तनपानाबाबत जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने दर वर्षी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. लोकसंख्या, माता-बाल आरोग्य, पोषण आणि कुटुंब कल्याणाशी संबंधित विविध निर्देशकांचे मूल्यांकन करणारे केंद्र सरकारचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण हे देशातील सर्वांत महत्त्वाचे सर्वेक्षण मानले जाते.
या सर्वेक्षणाच्या २०१९ ते २०२१ या कालावधीतील अहवालानुसार, जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ आईचे दूध मिळणाऱ्या बालकांचे प्रमाण ६३.७ टक्के होते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या एनएफएचएस-६ च्या आकडेवारीत हे प्रमाण आठ टक्क्यांनी घसरून ५५.८ टक्क्यांवर आले आहे. या घसरणीमुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्तनपानाची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी केवळ आईची इच्छाशक्ती पुरेशी नसून, कुटुंब, आरोग्य यंत्रणा आणि तज्ज्ञांचे सातत्यपूर्ण सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. प्रसूतीनंतर अनेक महिलांना बाळाला योग्य प्रकारे स्तनपान कसे द्यावे, दूध कमी येणे, स्तनात वेदना किंवा सूज यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या वेळेत सोडवल्या गेल्या नाहीत, तर आईचा आत्मविश्वास कमी होऊन स्तनपान लवकर बंद होण्याची शक्यता वाढते. याचा विपरीत परिणाम आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. स्तनपानाला केवळ आईची जबाबदारी म्हणून पाहणे चुकीचे ठरते. नवमातेला घरातील सदस्यांचा भावनिक आधार, प्रसूतीनंतर योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि कार्यस्थळी अनुकूल वातावरण मिळाल्यास स्तनपानाचा कालावधी वाढण्यास मोठी मदत होते.
गेल्या काही काळात प्रसुती या जोखमीच्या आणि गुंतागुंतीच्या बनत आहे. त्यामुळे स्तनपानचा कालावधी कमी होत चालला आहे. तसेच, आता मुलींमध्ये रक्तदाब, स्थूलता यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. करिअरमुळे आई बाळाला स्तनपान करण्यास फारशी उत्सुक नसल्याचेही पाहायला मिळते. कुटुंबपद्धती बदलत चालली आहे. तसेच, गर्भधारणेच्यावेळी स्त्रियांमध्ये अशक्तपणा, जीवनसत्वांची मोठी कमतरता असते. त्यामुळेही स्तनपानाचा कालावधी कमी होत आहे. अशी प्रतिक्रिया डीजे महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तज्ञ विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शिल्पा नाईक यांनी नोंदवली.
स्तनपानाचे महत्त्व
- पहिल्या सहा महिन्यांसाठी बाळासाठी संपूर्ण आणि सर्वोत्तम अन्न
- संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो
- लठ्ठपणा, मधुमेह, दीर्घकालीन आजाराची शक्यता कमी
- मेंदूची वाढ व विकासाला चालना
- आई-बाळातील भावनिक नाते अधिक दृढ होण्यास मदत
- गर्भधारणेमुळे आईमध्ये येणारी स्थूलता कमी होण्यास मदत
- स्तन व अंडाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी
