पुणे : ‘सैन्य दल, तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत चीनपेक्षा बराच मागे आहे. तंत्रज्ञानासंदर्भात तर भारतात फार काही घडलेले नाही. मात्र, आता सैन्य दल, उद्योग, तंत्रज्ञ, प्रशासन, शिक्षण क्षेत्र अशा सर्वच घटकांनी एकत्र येऊन भविष्यातील गरजांची कल्पना करून तंत्रज्ञान विकसनाबाबत समग्र विचार करण्याची गरज आहे,’ असा सूर शनिवारी व्यक्त झाला.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी) आणि ‘सेंटर फॉर चायना ॲनॅलिसिस अँड स्ट्रॅटेजी’ (सीसीएएस) यांच्यातर्फे आयोजित ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये ‘इज ऑल वेल विथ द पीपल्स लिबरेशन आर्मी?’ या विषयावर नितीन गोखले यांनी ब्रिगेडियर (नि.) अंशुमान नारंग, रिअर ॲडमिरल (नि.) माँटी खन्ना, अभ्यासक सुयश देसाई यांच्याशी संवाद साधला. परिषदेत भारत-चीन व्यापारी संबंध, भारत-चीनचे भविष्यातील संबंध अशा विविध विषयांवरील सत्रांमध्ये मान्यवर सहभागी झाले.

‘चीन काही बाबतीत रशिया आणि अमेरिकेच्याही पुढे आहे. भारत मात्र चीनच्या फार मागे आहे. सैन्य दलांच्या संयुक्ततेबाबत भारताने चीनकडून शिकले पाहिजे. लष्कराच्या प्रत्येक पलटणीला नवउद्यमींशी जोडले पाहिजे. नवोन्मेष, तंत्रज्ञानासाठी निधी आहे, नव्या कल्पनांची गरज आहे. नवी उत्पादने विकसित झाली पाहिजेत,’ असे नारंग यांनी सांगितले.

‘लष्करामध्ये बदल करणे हा प्रामुख्याने राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे. बाकीचे देश काय करतात यातून चीन धडे घेतो. शांततेच्या मार्गाने प्रश्न न सुटल्यास काय करायचे, याचे सिद्धान्त त्यांच्या साहित्यात लिहून ठेवलेले आहेत. तैवान प्रश्न त्या पद्धतीने हाताळला जाईल,’ असे देसाई यांनी नमूद केले.

‘भारताने सॉफ्टवेअरशिवाय आता हार्डवेअर क्षेत्रात क्षमता विकास करणे आवश्यक आहे. चीनने अभियांत्रिकी शिक्षणावर भर दिला आहे. चीनमधील उद्योगांमध्ये पीएच.डी.धारक काम करतात. चीनमधील मनुष्यबळाची कार्यक्षमता जास्त आहे,’ असे टाटा ऑटोकॉम्पचे उपाध्यक्ष अरविंद गोयल यांनी नमूद केले.

चिनी कंपन्यांची भारतात गुंतवणूक आवश्यक

‘भारत-चीन व्यापार संबंध : संधी आणि आव्हाने’ या सत्राचे संचालन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी केले. या सत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ राकेश मोहन, उद्योजक डॉ. सुधीर मेहता, डॉ. इशिता घोष, संतोष पै सहभागी झाले. ‘चीनमधील कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले पाहिजे. त्यातून भारतीय उद्योजक शिकतील. भारतातील मनुष्यबळाची कार्यक्षमता चीनच्या तुलनेत कमी आहे. चीनमधील लोकांना भारताचा व्हिसा न देण्याचे धोरण बदलले पाहिजे,’ असे मोहन यांनी सांगितले.

‘भारताने तेलावरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला पाहिजे. आपण कुठे कमी पडतो याचा विचार करून स्वत:मध्ये बदल केला पाहिजे,’ असे डॉ. मेहता म्हणाले. ‘चीनमधील उद्योगांवर लक्ष ठेवून त्यांच्या धोरणांचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून भारताचा फायदा साध्य करण्याचा प्रयत्न असायला हवा. चीनच्या तुलनेत संशोधन विकासाकडे भारतात लक्ष देणे, गुंतवणूक करणे, क्षमता विकासावर भर देण्याची गरज आहे,’ असे पै यांनी नमूद केले.

‘बरोबरी करण्यासारखी स्थिती नाही’

‘भारत-चीन संबंध : भविष्यातील मार्ग’ या विषयावरील सत्रात अमित परांजपे यांनी माजी राजदूत अशोक कांता, प्रा. कांती वाजपेयी, नम्रता हसिजा यांच्याशी संवाद साधला. ‘भारत-चीन संबंधांमध्ये नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान-चीन संबंधांना नवे पैलू मिळाले आहेत,’ असे कांता यांनी सांगितले. ‘येत्या काळात तिबेट प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारत-चीन-अमेरिका यांची गतिशीलता भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. भारत-चीन संबंध सीमावादाशिवाय आर्थिक आणि व्यूहात्मक परिसंस्थेवर अवलंबून आहेत. भारत कोणत्याही क्षेत्रात चीनशी बरोबरी करू शकेल, अशी स्थिती नाही,’ याकडे प्रा. वाजपेयी यांनी लक्ष वेधले. तर, ‘चीनने आता अमेरिकेलाही आव्हान दिले आहे. चीनला आशियातील सर्वांत मोठी शक्ती व्हायचे आहे. भारत-चीन भूराजकीय स्थिती बदलती आहे,’ असे हसिजा यांनी सांगितले.