पुणे : कोळशाअभावी देशातील निम्मे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद पडण्याच्या वाटेवर असून, ९१ वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा साठा चिंताजनक आहे. या प्रकल्पांकडे आठवडाभर पुरेल इतकाही कोळसा नाही. त्यात सकाळच्या जास्त मागणीच्या आणि सायंकाळनंतरच्या विजेची मागणी पुरवण्यासाठी याच प्रकल्पांवर अवलंबून राहावे लागत असल्याने ऐन दिवाळीत विजेच्या तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे.

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत (२७ ऑक्टोबर) ११९ पैकी ९१ वीजनिर्मिती केंद्रांमधील कोळशाचा नियमन साठा २५ टक्क्यांहून कमी, म्हणजे अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. वाढत्या विजेची गरज भागविण्यासाठी सर्व औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत आहेत. या १९१ औष्णिक वीजनिर्मितांची एकूण क्षमता २ लाख २५ हजार १८८ मेगावॅट आहे. या प्रकल्पांसाठी कोळशाच्या ६१२ लाख टन नियमन साठ्याची गरज असते. सध्या आवश्यकतेच्या केवळ ३२ टक्के साठा शिल्लक आहे. तर, ९१ वीजनिर्मिती प्रकल्प चिंताजनक अवस्थेत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ६० प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा २५ टक्क्यांहून कमी होता. तर, २१ ऑक्टोबरला १०० वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा चिंताजनक होता.

सध्या ‘एल-निनो’मुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जलविद्युत निर्मितीमध्ये मोठी घट नोंदविण्यात आली आहे. तर दिवसा निर्माण होणारी सौर उर्जा सायंकाळच्या वेळेत वापरता येत नसल्याने सकाळी जास्त मागणी असलेल्या आणि सायंकाळनंतरच्या वेळेतील विजेची मागणी पुरवण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रांवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यात देशभरात विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, दैनंदिन विजेची मागणी ४५ ते ५० गिगावॉट-तास आहे.

‘महानिर्मिती’च्या प्रकल्पांबाबत प्रश्न

‘महानिर्मिती’च्या भुसावळ, चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी, नाशिक, पारस, परळी या सातही प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा चिंताजनक पातळीवर आहे. हे प्रकल्प सुमारे १० हजार २०० मेगावॅट क्षमतेने चालतात. या प्रकल्पांमध्ये कोळशाचा ३५.१३ लाख टन नियमन साठा असणे गरजेचे आहे. आता मात्र केवळ ५.६४ लाख टन कोळसा उपलब्ध आहे. ‘महानिर्मिती’कडे एकूण गरजेच्या केवळ १६ टक्के कोळसा उपलब्ध असून, तीन-चार दिवस पुरेल इतकाच साठा आहे.

वीजनिर्मिती प्रकल्पांमधील कोळशाचा साठा वाढविण्यात येत आहे. पुरवठा साखळी सुधारण्यासाठीचे आवश्यक प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकल्पांमधील कोळशाचा साठा चिंताजनक नाही. – श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री