पुणे : ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानामुळे स्फोटके आणि दारूगोळा निर्मिती क्षेत्रात खासगी उद्योग, नवउद्यमींच्या माध्यमातून खासगी क्षेत्राचा सहभाग वाढत आहे. देशातील संरक्षण साहित्याचे उत्पादन १ लाख ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचले असून, त्यात खासगी क्षेत्राचा वाटा सुमारे २५ टक्के झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी दिली.

गुणवत्ता हमी महासंचालनालयातर्फे (डीजीक्यूए) आयोजित ‘लष्करी स्फोटके आणि प्रणोदक : सुरक्षा व अनुपालन’ या चर्चासत्राच्या उद्घाटनानंतर संजीवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही काळात नागपूर, भंडारा आणि इतर ठिकाणी घडलेल्या दारूगोळा कारखान्यांतील अपघात, तंत्रज्ञानाचा वापर, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

संजीव कुमार म्हणाले, ‘सुरक्षेच्या बाबतीत सरकारी आणि खासगी उद्योगांसाठी वेगवेगळे नियम नाहीत. सीएफईईएस आणि पीईएसओ यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन्ही क्षेत्रांतील उद्योगांना समान सुरक्षा निकष लागू आहेत. सरकारी दारूगोळा कारखान्यांमध्ये घडलेल्या अपघातांनंतर स्वतंत्र सुरक्षा सुधारणा आराखडा राबवण्यात येत आहे. संरक्षण उत्पादन विभाग त्यावर सातत्याने देखरेख करत आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम उत्पादन व्यवस्था उभारण्यावरही भर दिला जात आहे.

स्फोटके आणि दारूगोळा निर्मिती क्षेत्रात येणाऱ्या नव्या उद्योगांसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे तीन प्रमुख पर्याय असल्याचे मनोहरण यांनी सांगितले. पुण्यातील संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) कडून तांत्रिक मार्गदर्शन घेता येते. याशिवाय देशातील विद्यमान उत्पादक कंपन्यांशी तांत्रिक सहकार्य किंवा परदेशी कंपन्यांकडून तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचाही पर्याय उद्योगांसमोर उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण दलांमध्ये सराव किंवा चाचणीदरम्यान दारूगोळ्याशी संबंधित अपघात झाल्यास त्यासाठी स्वतंत्र ‘दोष तपास प्रक्रिया’ कार्यान्वित असल्याची माहिती मनोहरन यांनी दिली. संबंधित दारूगोळ्याचे अवशेष आणि त्याच उत्पादन तुकडीतील नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करून दोष स्फोटकात आहे की उत्पादन प्रक्रियेत, याचा शोध घेऊन उत्पादकांना आवश्यक सुधारणांबाबतच्या शिफारसी केल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी पुणे महत्त्वाचे

पुण्यासह महाराष्ट्रात संरक्षण आणि दारूगोळा उद्योगांची संख्या मोठी आहे, डीआरडीओसारख्या प्रयोगशाळा, लष्करी स्फोटके नियंत्रण कार्यालयही पुण्यात आहे. त्यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे, असे संजीवकुमार यांनी नमूद केले