इंदापूर : भारताला आगामी सन २०२५-२६ वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे. कारण देशामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे. तसेच देशात पुढील वर्षी इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. जगातील साखर व इथेनॉल उत्पादनाचा अभ्यास करता, भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा कायम आहे. असे मत भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज दुबई साखर परिषदेत व्यक्त केले.

२०२५ ही ७२ देशातील सातशे प्रतिनिधींच्या उपस्थितीत सध्या सुरू आहे. या साखर परिषदेत ‘ आम्ही भारतासाठी पुढे काय पाहतो? ‘ या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात भारताच्या भूमिकेबद्दल दुबईच्या साखर परिषदेत उत्सुकता दिसून आली. या चर्चासत्राच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी भारत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. ते पुढे म्हणाले, यावर्षी भारताने दहा लाख मे. टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. जागतिक साखर बाजारामध्ये भारताच्या साखरेची गुणवत्ता चांगली आहे.त्यामुळे भारताच्या साखरेला जगात मोठी मागणी आहे. भारताने आणखी साखरेची निर्यात करावी, असा सुर या साखर परिषदेतून व्यक्त करण्यात आला.

यासंदर्भात भारताची भूमिका मांडताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, भारत देशामध्ये साखर ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ग्राहक व कारखानदार या सर्वांचा समन्वय ठेवून भारत सरकारला धोरणे आखावी लागतात. केंद्र सरकार व राज्य सरकारे ही देशातील साखर उद्योगाच्या पाठीशी आहेत, त्यामुळे भारतात गेल्या आठ वर्षांमध्ये इथेनॉलमध्ये झालेली वाढ ही जगात इतरत्र कोणत्याही देशामध्ये झालेले नाही.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज ही भारत देशातील साखर कारखानदारीची फेडरल बॉडी असून, देशातील साखर कारखानदारी, शेतकरी यांना एकत्रित मदत, तांत्रिक सल्ला देण्याचे काम प्रभावीपणे करीत आहे. केंद्र सरकारला साखर उद्योगा संदर्भात धोरणे ठरवावी लागतात, सदरची धोरणे ठरविण्यामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

या चर्चासत्रामध्ये अनुप कुमार (व्यवस्थापकीय संचालक सक्डेन इंडिया), निरज शिरगावकर (अध्यक्ष, इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), रवी गुप्ता (संचालक श्री रेणुका शुगर), दीपक बल्लानी (महासंचालक, इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), संदीप कदम (अध्यक्ष, एक्झिम समिती, ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन), अश्विनी श्रीवास्तव ( सहसचिव, साखर, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग,भारत सरकार ) यांनी सहभाग घेतला.

Story img Loader